Pimpri: स्थायीचे सभापती अन् शिवसेना गटनेत्यामध्ये हमरीतुमरी; टक्केवारी बंद करा, सभेचे कामकाज लाइव्ह करा

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थायी समितीच्या बैठकीत सभापती विलास मडिगेरी आणि शिवसेनेचे सदस्य राहुल कलाटे यांच्यात हमरीतुमरी झाली. विषयावर चर्चा करण्याची मागणी कलाटे यांनी केली असता स्थायीची सभा कायद्याप्रमाणे चालणार असल्याचे मडिगेरी यांनी सांगितले. सभा कायद्याने चालवायची असेल. तर, स्थायीत मिळणारी टक्केवारी बंद करा, सभेचे चित्रीकरण करा, सभागृहात नागरिकांना बसू द्यावे, अशी मागणी कलाटे यांनी केली. वाद वाढत असल्याने भाजपच्या शीतल शिंदे यांनी दापोडी दुर्घटनेत मृत्यू झालेल्यांना श्रद्धांजली वाहण्याची सूचना केली. श्रद्धांजली वाहून सभा पुढील बुधवारपर्यंत तहकूब करण्यात आली.

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थायी समितीची साप्ताहिक सभा आज (बुधवारी) होती. विलास मडिगेरी सभेच्या अध्यक्षस्थानी होते. नेहमीप्रमाणे आज स्थायी सदस्यांची ‘प्रि’ (सभेच्या अगोदरची मिटींग) झाली नाही. थेट सभेला सुरुवात झाली. विषयपत्रिकेवरील पहिल्या क्रमांच्या विषयाला सभापती मडिगेरी यांनी मंजुरी दिली.

त्याला कलाटे यांनी आक्षेप घेतला. प्रत्येक विषयावर चर्चा करण्याची मागणी केली. स्थायी समितीची सभा सुरु होण्यापूर्वी सदस्यांची बैठक होऊन चर्चा करणे आवश्‍यक आहे. परंतू, पत्रिकेतील विषयांवर चर्चा न करताच मंजूर करण्याला त्यांनी आक्षेप घेतला. तसेच सभा प्रथा परंपरेने चालते की कायद्या प्रमाणे चालते असा सवाल केला. त्यावर सभा कायद्याप्रमाणे चालत असून मी माझ्या पद्धतीनेच कामकाज करणार असे उत्तर मडिगेरी यांनी दिले. त्यामुळे कलाटे यांच्यासह राष्ट्रवादीचे सदस्य आक्रमक झाले आणि वादाला सुरुवात झाली.

कलाटे म्हणाले, पत्रिकेवरील सगळे विषय सदस्यांना कळले पाहिजेत. त्याचे डॉकेट मिळाले पाहिजे. त्याचे जाहीरपणे वाचन केल्यावर चर्चा झाल्यावरच मंजूरी मिळाली पाहिजे. सभापतीच्या म्हणण्यानुसार कामकाज चालणार नाही. सभा कायद्याप्रमाणे चालते. तर, टक्केवारी कशी मिळते. स्थायीत मिळणारी टक्केवारी बंद करा. प्रत्येक विषयाला मतदान घ्यावे. सभपातींचा एक टक्का बंद करावा. सगळ्या ठेकेदारांना बोलून घ्या. स्थायी समितीची सभा लाइव्ह करा. सभेला नागरीकांना बोलवा. मी एका दिवसात मुख्यांमत्र्यांकडून याबाबत परवानगी आणतो.

वाद वाढत असल्याने मयुर कलाटे यांनी सभा तहकुब करण्याची मागणी केली. सदस्यांना विश्‍वासात घेउन चर्चा केल्यावर विषय मंजुर करावेत. वादग्रस्त विषय दालनात घेउ, चव्हाट्यावर काढू नका असा सल्ला शीतल शिंदे यांनी दिला. तसेच दापोडी दुर्घटनेत मृत्यू झालेले जवान विशाल जाधव व मजूर नागेश जमादार यांना श्रद्धांजली वाहण्याची सूचना त्यांनी मांडली. त्याला नगरसेवक राजेंद्र गावडे यांनी अनुमोदन दिल्यावर श्रद्धांजली वाहून सभा 11 डिंसेंबरपर्यंत तहकूब करण्यात आली.

  • विरोधकांचे सभेत गैरवर्तन – मडिगेरी
    स्थायी समितीचे सभा चालविण्याचे सर्व अधिकार पीठासीन अधिका-याला आहेत. महासभेचे कामकाज जसे चालते. त्यानुसारच स्थायी समितीचे देखील कामकाज चालते. सदस्याला कोणत्या विषयाला बोलू द्यायचे हा सभापतींचा अधिकार आहे. विषयाचे डॉकेट नगरसचिवांकडून त्यांनी घ्यावे. आपण नियमानुसारच काम करत आहोत. मी प्रत्येक विषयाला बोलून देतो. परंतु, राहुल कलाटे सभेत गैरवर्तन करत होते. त्यांची तक्रार करण्यात येणार आहे. त्यांच्याकडून दादागिरीची भाषा केली जाते. अरेरावी केली जाते. त्यांचा विरोध असेल तर त्यांनी विरोध नोंदवावा. त्यांच्या विरोध नोंदवून विषय मंजूर केले जातील, असे सभापती मडिगेरी यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.