Pimpri: पिंपळे गुरव दुर्घटना; आयुक्तांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा; नगरसेवकांची महासभेत मागणी

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेतर्फे गोरगरिबांच्या घरांवर नोटीस न देता बुलडोझर फिरविला जातो. मंदिराचे तर गेल्या अनेक दिवसांपासून अनधिकृतपणे बांधकाम सुरु होते. नदीपत्रात बांधकाम सुरु असताना महापालिकेने केवळ नोटीस देण्याचे सोपस्कार पार पाडले. महापालिकेने दुर्लक्ष केल्यामुळे मंदिराचे अनधिकृत बांधकाम सुरु होते. त्यामुळे मदिराचे सभामंडप कोसळून 3 मजूरांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या दुर्घटनेला आयुक्त श्रावण हर्डीकर हेच जबाबदार असल्याचा आरोप करत त्यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी विरोधी पक्षनेते दत्ता साने यांनी महासभेत केली.

पिंपरी-चिंचवड महापलिकेची फेब्रुवारी महिन्याची तहकूब महासभा आज (शुक्रवारी) पार पडली आहे. महापौर राहुल जाधव सभेच्या अध्यक्षस्थानी होते. दोन दिवसांपूर्वी पिंपळे गुरवमध्ये मंदिराचे बांधकाम सुरू असताना सभामंडप कोसळून तीन मजूरांचा दुर्दैवी अंत झाला. या घटनेचे पडसाद महासभेत उमटले.

  • विरोधी पक्षनेते दत्ता साने यांनी या घटनेकडे लक्ष वेधले. शहरात अनधिकृत बांधकामांचा प्रश्न गंभीर झाला आहे. एखादा नागरिक अवैध बांधकाम करत असेल. तर, पालिकेचे अधिकारी तात्काळ त्या बांधकामावर बुलडोजर फिरवतात. मात्र, पिंपळे गुरवमध्ये या मंदिराचे काम बेकायदेशीरपणे सुरू होते. पालिकेने 13 नोव्हेंबर 2018 रोजी तशी नोटीसही बजावली होती. तरी देखील हे काम कसे सुरू होते. नोटीस देण्याचे सोपस्कार पार पाडून अधिका-यांनी त्याकडे दुर्लक्ष केले.

दुर्घटना घडल्यानंतर मंदिरावार कारवाई करण्यात आली. त्याच्या अगोदर अधिकारी झोपले होते का? या दुर्घटनेला महापालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर हेच जबाबदार आहेत. या घटनेची सखोल चौकशी करून आयुक्त आणि त्यानंतरच्या अधिका-यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे, असेही ते म्हणाले.

  • शिवसेना गटनेते राहुल कलाटे: – या घटनेमुळे प्रशासनाच्या भूमिकेवर संशय निर्माण होत आहे. याप्रकरणाची सर्व प्रकारे चौकशी झाली पाहिजे. सामान्य नागरिकाने एखादे शेड उभारले तर ते पाडले जाते. मंदीराला आमचा विरोध नाही. परंतू, कोणतीही परवानगी नसताना या मंदीराचे काम कसे सुरू होते. आयुक्तांनी आता या प्रकरणासाठी चौकशी समिती नेमली आहे. या समितीने गोष्टी तपासून घेऊन दोषींवर कारवाई केली गेली पाहिजे.

राष्ट्रवादी अजित गव्हाणे:- पिंपळे गुरवमध्ये घडलेल्या या घटनेचे आम्ही राजकारण करत नाही. परंतू, अशी घटना पुन्हा घडू नये म्हणून योग्य ती पाऊले उचलली पाहिजे. आयुक्तांनी शहरातील सर्व मंदिरांची पाहणी केली पाहिजे. मंदिरांच्या बांधकामाकरीता नियम, अटी किचकट असल्यामुळे बेकायदेशीर कामे केली जातात. त्यात बदल केला. तर, कोणी बेकायदेशीर काम करणार नाही.

  • भाजपचे शशिकांत कदम:- पिंपळे गुरवमध्ये अनेक मंदिर आहेत. दुर्घटना घडलेले मंदिर रस्त्यात येत होते. त्यामुळेच त्या मंदिराचा जिर्णोध्दार करण्याचा निर्णय पिंपळे गुरवमधील ग्रामस्थांनी घेतला होता. गावक-यांनी वर्गणी काढून या मंदिराचे काम सुरू केले होते. या मंदिराशी आम्हा ग्रामस्थांच्या भावना जोडल्या गेल्यात. त्यामुळे यात कोणी राजकारण करू नये.

सभागृह नेते एकनाथ पवार: -पिंपळे गुरव म्हटलं की विरोधक एकही संधी सोडत नाहीत. प्रत्यकाने आपल्या प्रभागात मंदिर बांधले आहे. परंतु, पिंपळेगुरवचा विषय आला की विरोधक संधी सोडायचे नाव घेत नाहीत. त्यांच्या या भूमिकेची किव वाटते.

  • महापौर राहुल जाधव:- पिंपळे गुरवमधील घटना दुर्दैवी आहे. अशाप्रकारे मंदिरांची कामे करायची असतील तर पालिकेची परवानगी घेतली गेली पाहिजे. बांधकाम परवानगीत शिथीलता आणली गेली पाहिजे. त्यासाठी तातडीने बैठक घेतली जाईल. त्यासंदर्भात बैठक लावण्याचे निर्देश त्यांनी अधिका-यांना दिले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.