Pimpri: ‘आकाश चिन्ह परवाना विभागाचे अधिकारी ‘एंजट’ असल्यासारखे काम करतात’

स्थायी समिती सदस्य विकास डोळस यांचा आरोप

एमपीसी न्यूज – बोपखेल-दिघी प्रभागात अनधिकृत फलक आहेत. सांगाडे देखील लागले आहेत. प्रभागातील आम्ही चारही नगरसेवक अनधिकृत फलक, सांगाडे काढा, असे अधिका-यांना सांगत आहोत. तरी देखील फलक काढले जात नसल्याने संताप व्यक्त करत आकाश चिन्ह आणि परवाना विभागाचे अधिकारी बड्या कंपन्यांचे ‘एंजट’ असल्यासाराखे काम करत असल्याचा आरोप स्थायी समितीचे सदस्य विकास डोळस यांनी केला. सांगाडा पडून एखद्याचा जीव जाण्याची अधिकारी वाट पाहत आहेत का? असा सवालही त्यांनी केला. त्यावर अतिरिक्त आयुक्त संतोष पाटील यांनी पडताळणी करुन संबंधित विभागाला कारवाई करण्याचे आदेश दिले.

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थायी समितीची साप्ताहिक सभा आज (बुधवारी) पार पडली. सभेच्या अध्यक्षस्थानी सभापती ममता गायकवाड होत्या. विषयपत्रिकेवरील 41 विषय मंजूर करण्यात आले. तर, तीन विषय तहकूब करण्यात आले. एक विषय फेटाळण्यात आला. 81 कोटी 17 लाख रुपयांच्या विकास कामांना मान्यता देण्यात आली.

  • शहरातील पुलाखाली लावलेल्या भिंतीपत्रकावरील कारवाईबाबत सदस्य विलास मडिगेरी यांनी प्रशासनाला विचारणाला केली. शहरातील सर्वंच प्रभागातील पुलावर भिंतीपत्रक लावण्यात आली आहेत. त्यावर कोणती कारवाई केली. किती जणांवर फौजदारी गुन्हे दाखल केले, याची माहिती मडिगेरी यांनी विचारली.

त्यालाच अनुसरुन बोलताना सदस्य विकास डोळस म्हणाले, बोपखेल-दिघी प्रभागातील आम्ही चारही नगरसेवकांनी अनधिकृत फलक, सांगाडे काढायला अधिका-यांना वारंवार सांगितले आहे. तरीदेखील फलक काढले जात नाहीत. अधिकारी त्याकडे दुर्लक्ष करत आहेत. सांगाडा पडून एखादी दुर्घटना घडल्यावरच प्रशानाला जाग येणार का? असा संताप त्यांनी व्यक्त केला. आकाश चिन्ह आणि परवाना विभागाचे अधिकारी माहिती देखील खोटी देतात. किती जणांवर फौजदारी गुन्हे दाखल केले. त्याची देखील माहिती देण्यात आली नाही. डोळ्यासमोर अनधिकृत फलक दिसत असताना देखील कारवाई केली जात नाही. अधिकारी बड्या कंपन्यांचे ‘एंजट’ असल्यासाराखे काम करतात असा आरोप डोळस यांनी केला.

  • यावर अतिरिक्त आयुक्त संतोष पाटील म्हणाले, ”अनधिकृत फलकांची पडताळणी केली जाईल. त्यानंतर त्यावर कारवाई करण्यात येईल”.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.