Pimpri : घरगुती गॅस दरवाढीविरोधात काँग्रेसचे पिंपरीत आंदोलन; दरवाढ मागे घेण्याची मागणी

एमपीसी न्यूज – महागाईने अगोदरच जनतेचं कंबरडे मोडले असताना नागरिकांवर लादलेली घरगुती गॅसची 144 रुपयांची दरवाढ मागे घ्यावी, अशी मागणी करत व जोरदार घोषणाबाजी करत काँग्रेस कार्यकर्त्यांनी आज (दि. 16) पिंपरीत मोर्चा काढत आंदोलन केले.

देशामध्ये बेरोजगारी तसेच महागाई वाढली असताना केंद्र सरकार घरगुती गॅसचे दर वाढून सामान्य लोकांचे आणखीनच हाल करत आहे. घरगुती गॅसची १४४ रुपयांची दरवाढ ही नागरिकांवर लादली असून ती मागे घ्यावी, या मागणीसाठी शहर काँग्रेस ने रस्त्यावर उतरून आज (दि १६ ) पिंपरी येथे आंदोलन केले.

२०१५ मध्ये घरगुती गॅस सिलिंडरची किंमत ४५० रुपये होती. आता तोच गॅस सिलिंडर १००० रुपयांचा टप्पा गाठत असून सामान्य नागरिकांना हा नाहक दरवाढीचा त्रास सहन करावा लागत आहे. ही अन्यायकारक दरवाढ मागे घ्या, अन्यथा देशभर कॉंग्रेस रस्त्यावर उतरुन तीव्र आंदोलन करेल, असा इशारा पिंपरी चिंचवड कॉंग्रेसचे शहराध्यक्ष सचिन साठे यांनी दिला.

पिंपरी चिंचवड शहर जिल्हा कॉंग्रेसचे शहराध्यक्ष सचिन साठे यांच्या नेतृत्वाखाली आज (दि. १६) डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक पिंपरी येथे केंद्र सरकारने केलेल्या गॅस दरवाढी विरोधात आंदोलन करण्यात आले. या वेळी माजी महापौर कविचंद भाट, माजी नगरसेवक तुकाराम भोंडवे, शिक्षण मंडळाचे माजी उपसभापती विष्णुपंत नेवाळे, शाम अगरवाल, शहर कॉंग्रेसच्या महिला अध्यक्षा गिरीजा कुदळे, ज्येष्ठ नेत्या निगार बारसकर व इतर कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

केंद्रीय अर्थमंत्री आणि देशाचे पंतप्रधान हे बेजबाबदार पणे वागत असून त्यांच्या या बेजबाबदारपानाचा नाहक त्रास सामान्य जनतेला होत आहे. अश्या बेजबाबदार व मनमानी कारभार करणार्या पंतप्रधानांना जनतेने खुर्ची वरून खाली खेचायला हवे, असे सचिन साठे म्हणाले.

गिरीजा कुदळे यांनी यावेळी निषध नोंदवला. गॅस दरवाढ हा प्रश्न फक्त महिलांशी निगडीत नसून संपुर्ण कुटूंबाचा व देशातील सर्व नागरिकांशी संबंधित असा प्रश्न आहे. केंद्रात पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचे सरकार असताना आताच्या केंद्रीय मंत्री स्मृती इराणी गॅस दरवाढी विरोधात बांगड्यांचा आहेर दिला होता. आता त्यांनी तोच बांगड्यांचा आहेर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना द्यावा, असे त्या म्हणाल्या.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.