Pimpri: …अन् अजित पवार मनसे नगरसेवकावर भडकले

उपमुख्यमंत्री अजित पवार आज शहरात आले होते. : Pimpri: ... and Ajit Pawar got angry with MNS corporator

एमपीसी न्यूज – कोरोनाचा संसर्ग होऊ नये यासाठी सर्वजन काळजी घेत आहेत. मात्र, सार्वजनिक ठिकाणी फिजिकल डिस्टनचे पालन होताना दिसून येत नाही. याचाच प्रत्यत उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या आज कोविड सेंटर पाहणी दौ-या दरम्यान आला. मनसेचे नगरसेवक सचिन चिखले हे अजित पवारांशी शहरातील जिम चालू करण्याबाबत चर्चा करत होते. ते  जवळ आल्याने ‘फिजिकल डिस्टन्स ठेव की, चार ते पाच मंत्री बाधित झाले आहेत. लांबून बोल’, असे सांगत अजितदादा त्यांच्यावर भडकले.

त्यामुळे चिखले प्रश्न न सांगताच बाजूला झाले. दरम्यान,  ‘प्रत्यक्ष भेटून बोलू’, असे दादांना सांगितल्याचे चिखले यांनी ‘एमपीसी न्यूज’शी बोलताना सांगितले.

पुणे जिल्ह्यातील कोरोनाची वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता राज्य सरकार, पुणे, पिंपरी-चिंचवड पालिका, पीएमआरडी आणि जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत एकत्रितपणे नेहरूनगर येथे कोविड सेंटर उभारण्यात येत आहे.

या कामाची पाहणी करण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार आज शहरात आले होते. त्यांनी कामाची पाहणी केली. पाहणी करताना मात्र फिजिकल डिस्टन्सचा सर्वांना विसल पडला होता.

पाहणी करुन अजित पवार आपल्या वाहनाकडे जात असताना पालिकेतील मनसेचे गटनेते सचिन चिखले हे पवार यांच्याजवळ आले. ‘शहरातील मृत्यूदर वाढत आहे. त्यामुळे जातीने शहराकडे लक्ष द्या. तसेच शहरातील बंद असलेल्या जिम चालू कराव्यात’, असे ते सांगण्याचा प्रयत्न करत होते.

त्यावेळी अजित पवार यांनी ‘फिजिकल डिस्टन्स ठेव की, चार ते पाच मंत्री बाधित झाले आहेत. आम्ही कसे काम करतो आम्हाला माहिती आहे. लांबून बोल’, असे सांगत त्यांच्यावर भडकले. त्यामुळे चिखले प्रश्न न सांगताच बाजूला झाले.

याबाबत सचिन चिखले म्हणाले, ”पालिकेचे निमंत्रण होते म्हणून मी तिथे गेलो होतो. शहरातील कोरोनाची रुग्णसंख्या वाढत आहे. मृत्यूचे प्रमाणही वाढत आहे. त्यामुळे तुम्ही चांगल्या पद्धतीने शहरात लक्ष घाला. शहरातील जिम बंद आहेत. त्या चालू करण्याची परवानगी देण्याबाबत जिम चालक आंदोलन करत आहेत. त्यामुळे जिम चालू करण्याबाबत त्यांच्याशी मला बोलायचे होते. मी लांबूनच बोलत होतो. त्यांचा बॉडीगार्ड मला धक्का मारत होता. धक्का मारु नका, असे बॉडीगार्डला सांगताना ‘लांबूनच बोल’, असे दादा म्हणाले. ‘मी तुमच्याशी प्रत्यक्ष भेटून बोलतो’, असे मी त्यांना सांगितले. त्यावर ‘ठिक आहे काही हरकत नाही’, असे दादा म्हणाले”.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.