Pimpri: डॉ. आंबेडकर यांच्या जन्मगावातील शाळेला पिंपरी-चिंचवड भाजपची मदत

Pimpri-Chinchwad BJP helps Dr. Ambedkar's hometown school : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिनानिमित्त सामाजिक उपक्रम;भाजपा शहराध्यक्ष तथा भोसरीचे आमदार महेश लांडगे यांचा पुढाकार

एमपीसी न्यूज – शिका, संघटीत व्हा आणि संघर्ष करा, असा संदेश देणारे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जन्मगावी म्हणजे आंबडवे या ठिकाणी असलेली शाळा निसर्ग चक्रीवादळाच्या तडाख्यात जमीनदोस्त झाली. दापोलीतील ग्रामीण भागात असलेल्या या शाळेची डागडूजी करण्यासाठी आता भाजपा आमदार तथा शहराध्यक्ष महेश लांडगे यांच्या साथीने पिंपरी-चिंचवड भाजपा कार्यकर्त्यांनी पुढाकार घेतला आहे.

राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त ‘एक हात मदती’चा उपक्रमांतर्गत आमदार महेश लांडगे यांनी ‘निसर्ग’ चक्रीवादळात नुकसान झालेल्या कोकणातील विविध गावांमध्ये मतदकार्य करण्याचा निर्धार केला आहे. बुधवारी सकाळी ही मदत शाळेला पोहोच करण्यात आली.

यावेळी संस्थेचे अध्यक्ष माजी खासदार अमर साबळे, आमदार महेश लांडगे, नगरसेवक कुंदन गायकवाड, विकास डोळस, सामाजिक कार्यकर्ते डॉ. संतोष बारणे आदी उपस्थित होते.

रत्नागिरी जिल्ह्यात दापोली तालुक्यातील जालगाव या ठिकाणी सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक मंडळ नावाची संस्था आहे.

या संस्थेच्या माध्यमातून मंडणगड येथील लोकनेते गोपीनाथजी मुंडे कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय आहे. याठिकाणी सांस्कृतिक भवन, जिमखाना, महिला वसतिगृह आहे. मंडणगडपासून सुमारे १७ किमी अंतरावर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे जन्मगाव आंबडवे आहे.

आंबडवे येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यामंदिर व असोंड येथील आश्रमशाळा व वसतिगृह चालवले जाते. अत्यंत ग्रामीण भागात संस्थेचे कार्य सुरू आहे.

भटक्या विमुक्त समाजातील मुलांना, आर्थिकदृष्ट्या मागास वर्गातील मुलांना शिक्षणाची दारे खुली व्हावीत, या हेतुने संस्था कार्यरत आहे. गेल्या २६ वर्षांपासून संस्थेच्या ज्ञानार्जनाचे कार्य अखंडपणे सुरू आहे.

निसर्ग चक्रीवादळामुळे संस्थेचे मोठे नुकसान…

निसर्ग चक्रीवादळामुळे आंबडवे येथील आपल्या शाळेच्या इमारतीवरील व सांस्कृतिक भवनावरील एकही पत्रा व शेड शिल्लक राहिलेली नाही . तशीच परिस्थिती मंडणगड कॉलेज व बाकी शाळांची झालेली आहे.

कॉलेज इमारतीवरील तसेच लेडीज हॉस्टेल व सांस्कृतिक भवनावरील सुमारे 1100 पत्र्यांचे नुकसान झाले आहे . किमान 50 ते 60 लाखांचे नुकसान आपल्या सर्व प्रकल्पाचे झाले आहे.

गेल्या महिनाभरात पत्रे बसवण्याचे काम सुरु असून ते प्रगतीपथावर आहे. सांस्कृतिक भवन आणि महिला वसतिगृहाचे काम मदतीच्या प्रतीक्षेत आहे. मंडणगडच्या युनिटचे मोठे नुकसान झाले.

संस्थेच्या सर्वच पाच युनिटमधील वीज पुरवठा व्यवस्था कोलमडली आहे अशी माहिती संस्थेचे कार्याध्यक्ष श्रीराम इदाते यांनी दिली.

राज्य शासन पुरस्कारप्राप्त शाळा पण संकटात मदत शून्य…

कर्मवीर दादासाहेब इदाते यांच्या प्रेरणेने सुरू झालेल्या या संस्थेने गेली 26 वर्ष शिक्षण क्षेत्रात अतुलनीय कार्य केले आहे. भाजपाचे माजी राज्यसभा सदस्य अमर साबळे संस्थेचे विद्यमान अध्यक्ष आहेत. कर्मवीर दादांनी सुरू केलेल्या या सर्व संस्था अतिशय दुर्गम भागात कार्यरत आहेत.

त्यामुळे साहजिकच आर्थिक विषयामध्ये संस्थेने कधीही पैसा कमविण्याचा अथवा शिक्षणाचा धंदा करण्याचा प्रयत्न केला नाही. संस्था 80 G मान्यताप्राप्त असून आपल्या संस्थेला महाराष्ट्र शासनाचा मानाचा शाहू- फुले-आंबेडकर हा पुरस्कार देखील प्राप्त झाला आहे.

परंतु, निसर्ग चक्रीवादळ होवून एक महिना झाला. पण, राज्य सरकार अथवा जिल्हा प्रशासनाकडून कसलीही मदत संस्थेला मिळालेली नाही, अशी खंतही कार्याध्यक्ष इदाते यांनी व्यक्त केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.