BNR-HDR-TOP-Mobile

Pimpri : पिंपरी-चिंचवड दर्शन बस सेवा सुरु होणार; भोसरी व निगडी चौकातून सकाळी नऊ वाजता सुटणार बस

तीर्थक्षेत्र देहू व आळंदीचा समावेश; 400 ते 500 रूपये तिकीट असणार

एमपीसी न्यूज – पुणे शहराच्या धर्तीवर पिंपरी-चिंचवड दर्शन बस सेवा सुरू करण्यात येणार आहे. त्यासाठी पीएमपीएलकडून दोन वातानुकूलित बस उपलब्ध करून दिल्या आहेत. त्याची क्षमता 32 आसनाची आहे. प्रती व्यक्ती अंदाजे 400 ते 500 रूपये शुल्क असणार आहे. उपशहरातील दोन मार्गावरुन या बस धावणार असून सकाळी नऊला निगडीच्या भक्ती-शक्ती समूह शिल्प चौक आणि भोसरी चौकातून सुटणार आहेत. त्यात तीर्थक्षेत्र देहू व आळंदीचा समावेश करण्यात आला आहे. वातानुकूलित बसबाबतचा प्रस्ताव पीएमपीएलच्या संचालक मंडळाने गुरुवारी (दि. 18)झालेल्या बैठकीत तहकूब ठेवला आहे.

पुणे शहराच्या धर्तीवर ही बस असणार आहे. पीसीएमटी असताना शहरातून पिंपरी-चिंचवड दर्शनसाठी मिनी बस होती. त्यासाठी 70 रूपये इतके तिकीट होते. पीसीएमटीचे पीएमपीएलमध्ये विलिनीकरण झाल्याने ती सेवा बंद झाली. शहराच्या पर्यटनासाठी स्वतंत्र बस सुरु करण्याची मागणी सातत्याने केली जात होती. त्यानुसार पीएमपीएलने 2 वातानुकूलीत बस उपलब्ध करून दिल्या आहेत. त्याची क्षमता 32 आसनाची आहे. त्यासाठी प्रती व्यक्ती अंदाजे 400 ते 500 रूपये शुल्क असणार आहे.

सायन्स पार्क व बर्ड व्हॅली उद्यान व इतर ठिकाणी असलेले शुल्क संबंधित व्यक्तीस स्वत: भरावे लागणार आहे. पुणे दर्शन बसचे सध्याचे तिकीट 500 रूपये आहे. पीएमपीएलच्या संकेतस्थळावर ऑनलाईन तिकीट नोंद करण्याची सोय उपलब्ध करून देण्यात येणार आहे. पीएमपीएलचे समन्वयक संतोष माने म्हणाले, “पुणे विमानतळावरून ये-जा करण्यासाठी असलेल्या बसेस पीएमपीएलने या दर्शन सेवेसाठी पुरविल्या आहेत. एक बस फेरीमध्ये सुमारे 75 किलोमीटर अंतर कापले जाणार आहे”

एक बस सकाळी नऊला निगडीच्या भक्ती-शक्ती समुह शिल्प चौकातून सुटणार आहे. तेथून रावेत येथील इस्कॉन मंदिर, चिंचवडगावातील मोरया गोसावी मंदिर, मंगलमूर्ती वाडा, चापेकर वाडा, चापेकर बंधू स्मारक, सायन्स पार्क, संभाजीनगरची बर्ड व्हॅली, निगडीची दुर्गा देवी टेकडी, अप्पूघर असे फिरून तीर्थक्षेत्र देहूगाव मार्गे निगडीत परतणार आहे. हे अंतर 43.50 किलोमीटर आहे.

तर, दुसरी पिंपरी-चिंचवड दर्शन बस भोसरी चौकातून सुटून आळंदीत दर्शन होणार आहे. तेथून लांडेवाडीतल शिवसृष्टी दाखविली जाणार आहे. त्यानंतर बर्ड व्हॅली, सायन्स पार्क, मोरया गोसावी मंदिर, चापेकर वाडा, मंगलमूर्ती वाडा, दुर्गादेवी टेकडी व भक्ती-शक्ती समुह शिल्प दाखविले जाणार आहे. समारोप सायंकाळी सहाला भोसरीत होणार आहे. हे अंतर 51.30 किलो मीटर आहे. याबाबतचा प्रस्ताव पीएमपीएमएलच्या संचालक मंडळाने तहकूब ठेवला आहे.

HB_POST_END_FTR-A2

HB_POST_END_FTR-A3