Pimpri : पाणीकपात करणा-या पदाधिका-यांच्या मानधनात पन्नास टक्के कपात करा- सचिन साठे

एमपीसी न्यूज – पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने 25 नोव्हेंबरपासून दिवसाआड पाणीपुरवठा सुरु केला आहे. हा निर्णय घेणा-या महापालिकेच्या सर्व पदाधिका-यांच्या मानधनात व अधिका-यांच्या वेतनात पन्नास टक्के कपात करावी. अशी मागणी पिंपरी चिंचवड शहर जिल्हा कॉंग्रेसचे अध्यक्ष सचिन साठे यांनी केली आहे. मागणी मान्य न झाल्यास 1 डिसेंबर रोजी आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्या निवासस्थानी पिंपरी चिंचवड शहर जिल्हा कॉंग्रेसच्या वतीने मोर्चा काढून आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

याबाबत महापौर माई ढोरे व आयुक्त श्रावण हर्डीकर यांना निवेदन देण्यात आले आहे. या निवेदनामध्ये म्हटले आहे की, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेला पवना धरणातून पाणी पुरवठा केला जातो. मागील वर्षी सरासरीपेक्षा 127 टक्क्यांहून जास्त पाऊस पवना धरण परिसरात झाला आहे. धरणात मागील वर्षीपेक्षा जास्त जलसाठा आजही आहे. चालू वर्षी जास्त झालेल्या पावसामुळे धरणक्षमतेच्या चौपट पाणी नदीव्दारे विसर्ग करून सोडण्यात आले. पुढील वर्षी सप्टेंबर अखेरपर्यंत पुरेल एवढा पाणीसाठा असतानाही निव्वळ आयुक्त श्रावण हर्डीकर आणि पाणीपुरवठा विभागाच्या अकार्यक्षमतेमुळे अपु-या पाणीपुरवठ्याचा त्रास नागरिकांना सहन करावा लागणार आहे.

दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचे आयुक्तांचे नियोजन म्हणजे त्यांच्या अपयशाची व अकार्यक्षमतेची कबुलीच आहे. प्रशासनावर अंकुश नसलेल्या आयुक्तांनी राजीनामा द्यावा तसेच हा निर्णय घेणा-या महापालिकेच्या सर्व पदाधिका-यांच्या मानधनात व अधिका-यांच्या वेतनात पन्नास टक्के कपात करावी अशी मागणी सचिन साठे यांनी केली आहे. जोपर्यंत पाणीपुरवठा सुरळीत होत नाही, तोपर्यंत ही वेतनकपात लागू ठेवावी अन्यथा १ डिसेंबर रोजी आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्या निवासस्थानी पिंपरी चिंचवड शहर जिल्हा कॉंग्रेसच्या वतीने मोर्चा काढून आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

तसेच मागील तीन वर्षाच्या कार्यकाळात पाणीपुरवठा सुरळीत व्हावा या मागणीसाठी शहर काँग्रेसच्या वतीने वेळोवेळी आंदोलने, मोर्चा काढण्यात आले होते. मागील सार्वत्रिक निवडणुकीत शहरभर चोवीस तास पुरेशा दाबाने आणि शहराला बंद जलवाहिनीव्दारे पाणीपुरवठा करू असे आश्वासन भाजपाने आपल्या जाहीरनाम्यामध्ये दिले होते. आता पिंपरी चिंचवड महानगरपालिकेवर भाजपाची एकहाती सत्ता आहे. सत्ताधा-यांचे आयुक्तांवर नियंत्रण नाही आणि आयुक्तांचा प्रशासनावर अंकुश नाही. त्यांची निष्क्रीयता वेळोवेळी सिद्ध झाली आहे. पाणीगळती व पाणीचोरी रोखण्यास मनपा प्रशासनाला पूर्णत: अपयश आले आहे.असेही या निवेदनात म्हटले आहे.

सचिन साठे यांनी शहर कॉंग्रेसच्या शिष्टमंडळासमवेत महापौर माई ढोरे यांना पत्र दिले. यावेळी माजी महापौर कविचंद भाट, माजी नगरसेवक राजा
गोलांडे, सेवादलाचे राष्ट्रीय सहसचिव संग्राम तावडे, शहर महिला काँग्रेस अध्यक्षा गिरीजा कुदळे, लक्ष्मण रूपनर, सेवादलाचे शहराध्यक्ष मकरध्वज
यादव, अल्पसंख्यांक सेल शहराध्यक्ष शहाबुद्दीन शेख, विशाल कसबे, मेहताब इनामदार, हिरामण खवळे, चंद्रशेखर जाधव, बाबा बनसोडे, मुनसफ शेख, संदेश बोर्डे, मोहन अडसूळ, कुंदन कसबे, व्ही.एस.कबीर, विठ्ठल कळसे उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.