Pimpri: शहर शिवसेनेत राजकीय भूकंपाची शक्यता

एमपीसी न्यूज – आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेने पुणे जिल्ह्यातील संघटनेच्या डागडुजीस सुरुवात केली आहे. पुणे शहरातील शहरप्रमुखपद स्थगित केले. महापालिका गटनेता बदलला आहे. शिरूरमधील पदाधिकारी बदलले आहेत. जिल्हा परिषदेतील गटनेत्यांची हकालपट्टी केली. या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवड शहरातील शिवसेनेत देखील लवकरच फेरबदल होऊ घातले आहेत. यामुळे शहर शिवसेनेत भूकंप होणार असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे.

शिवसेनेने पुणे जिल्ह्यातील संघटनेत फेरबल सुरु केले आहेत. त्यानुसार पुणे महापालिकेतील गटनेते संजय भोसले यांना बदलून पृथ्वीराज सुतार यांची गटनेतेपदी नियुक्ती केली. शहरप्रमुखपद स्थगित केले आहे. शिवाजीराव आढळराव यांच्याकडे उपनेतेपद दिले आहे. संघटना बांधणीची त्यांच्यावर जबाबदारी दिली आहे. त्यांनी विधानसभेची तयारी सुरु केली आहे. पक्षविरोधी कारवाया केल्याचा ठपका ठेवत शिवसेनेच्या जिल्हा परिषदेतील गटनेत्या आशा बुचके यांची पक्षातून हकालपट्टी केली. शिरूरचे जिल्हाप्रमुख राम गावडे यांना पदावरून दूर केले. त्यांच्या जागी जिल्हा परिषद सदस्य माऊली कटके यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तालुकाप्रमुख नवीन नेमले आहेत.

त्या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवड शहर शिवसेनेत देखील बदल होण्याची शक्यता आहे. मावळ लोकसभा मतदारसंघातून बारणे यांनी पार्थ पवार यांचा मोठ्या मताधिक्याने पराभव केला. त्यामुळे बारणे यांचे ‘मातोश्री’वर वजन वाढले आहे. शिवसेनेत खासदार श्रीरंग बारणे आणि महापालिका गटनेते राहुल कलाटे असे दोन गट आहेत. त्यांच्यात सातत्याने धुसफूस सुरू असते. लोकसभा निवडणुकीत बारणे यांना पक्षातील ‘फितुरांचा’ त्रास सोसावा लागला. काही संदर्भ नसताना त्याचे महापालिका सभेत पडसाद उमटले. नगरसेवक सचिन भोसले यांनी लोकसभेला पक्षविरोधी भूमिका घेणा-यांची हकालपट्टी करण्याची मागणी केली.

स्मार्ट सिटीतील संचालक पदावरून राहुल कलाटे आणि नगरसेवक प्रमोद कुटे यांच्यात वाद सुरूच आहे. कलाटे गटनेते असून ‘एम’ व्हिटॅमिन देणा-या स्थायी समितीचे देखील ते सदस्य आहेत. एकाच व्यक्तीकडे दोन पदे असल्याने नगरसेवकांमध्ये खदखद आहे. ती सातत्याने उफाळून येते. नऊ नगरसेवकामध्ये कोणताही ताळमेळ नाही. महापालिकेत विरोधात असूनही सभागृहात एकही नगरसेवक आक्रमकपणे बोलत नाही.

काही नगरसेवक शिवसेनेच्या दालनात देखील फिरकत नाहीत. शहर सुधारणा समितीत निवड होताच रेखा दर्शिले यांनी तडकाफडकी राजीनामा दिला होता. कलाटे यांनी स्मार्ट सिटीच्या ‘ई-लर्निंग’च्या निविदेला आक्षेप घेतल्याने शिवसेनेचेच नगरसेवक सचिन भोसले यांनी कलाटे यांच्यावर तोंडसुख घेतले. या पक्षातील बेदलीची पक्षनेतृत्वाने गांभीर्याने दखल घेतली असून संघटनेत लवकरच बदल होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

याबाबत बोलताना पिंपरी-चिंचवडचे संपर्कप्रमुख बाळाभाई कदम म्हणाले, ”संघटनेत आवश्यकतेनुसार फेरबदल होत असतात. संघटनात्मक रचना केली जाते. फेरबदलात कार्यकर्त्यांना वेग-वेगळ्या जबाबदा-या दिला जातात. पक्षाची निर्णय घेण्याची एक प्रक्रिया आहे. परंतु, अद्याप पिंपरी-चिंचवड शहर संघटनेतील बदल करण्याचा निर्णय घेतला नाही. प्रत्येकाला पद मिळण्याची अपेक्षा असते. नगरसेवकांमध्ये कोणताही अंतर्गत वाद नाही. काही मतभेद असतील तर सामजस्यांने सोडविले जातील”

आमदार गौतम चाबुकस्वार म्हणाले, “संघटना वाढविण्याचे काम सुरु आहे. संघटनेतील फेरबदलाचा निर्णय वरिष्ठ पातळीवरुन घेतला जाईल”.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.