Pimpri: अर्थसंकल्पासाठी दहा लाखांपर्यंतची कामे सुचवा, आयुक्तांचे नागरिकांना आवाहन

अर्जस्वीकृतीची मुदत 25 नोव्हेंबर

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने सन 2020-2021 या आर्थिक वर्षांसाठी अर्थसंकल्प तयार करण्याचे काम सुरू झाले आहे. त्यासाठी नागरिकांनी दहा लाखांपर्यंतची कामे सुचविण्याचे आवाहन महापालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी केले आहे.

महापालिकेच्या वतीने नव्या वर्षांचे अर्थसंकल्प तयार करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. अर्थसंकल्पात नागरिकांनी सुचविलेल्या कामांचा समावेश केला जातो. त्यानुसार नागरिकांनी त्यांच्या क्षेत्रीय कार्यालय किंवा प्रभागातील कामे सुचवावी. आपल्या परिसरातील गरजेनुसार आवश्यक व योग्य कामांचा समावेश अर्थसंकल्पात करण्यात येतो.

त्यासाठी विहीत नमुन्यातील अर्ज प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयात कार्यालयीन वेळेमध्ये विनामूल्य वाटपाकरिता उपलब्ध आहेत. नागरिकांनी आपल्या सूचना अर्ज 25 नोव्हेंबरपर्यंत सायंकाळी पाचपर्यंत संबंधित क्षेत्रीय कार्यालय किंवा ई-मेलवर स्वीकारण्यात येणार आहेत. संबंधित क्षेत्रीय अधिकारी व कार्यकारी अभियंता हे सुचविलेल्या कामांची शहानिशा करून विकासकामांचा समावेश अर्थसंकल्पात करतील, यांची नागरिकांनी नोंद घ्यावी.

नागरिकांनी अर्थसंकल्पासाठी चांगल्या कामांची सूचना पाठवावी, असे आवाहन आयुक्त हर्डीकर यांनी केले आहे. मुदतीनंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही.

दहा लाख खर्चापर्यंतची कामे नागरिकांना सुचविता येणार आहेत. पूल, उड्डाणपूल, नवे रस्ते, भवन, बांधकाम अशी मोठी कामे सुचविता येणार नाहीत. नागरिकांनी कामाचे स्वरूप व स्थान अचूकपणे लिहावे. कामानुसार अर्जातील रकाने भरावे. अर्ज भरण्याआधी क्षेत्रीय कार्यालय किंवा सारथी हेल्पलाईनवर (8888006666) संपर्क साधावा.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.