Pimpri : पिंपरी-चिंचवड दर्शन बसचे केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते उद्‌घाटन

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड दर्शन बस सेवेचे केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते आज (शनिवार) उद्‌घाटन करण्यात आले आहे. आजपासून उपशहरातील दोन मार्गावरुन या वातानुकूलीत बस धावणार असून प्रती व्यक्ती 500 रूपये शुल्क असणार आहे.

निगडी येथे झालेल्या कार्यक्रमाला राज्याचे सामाजिक न्याय राज्यमंत्री अविनाश महातेकर, महापौर राहुल जाधव, स्थायी समिती सभापती विलास मडीगेरी, महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्यासह नगरसेवक, नगरसेविका उपस्थित होते.

या मार्गावरून धावणार पिंपरी-चिंचवड दर्शन बस

एक बस सकाळी साडेआठ वाजता निगडीच्या भक्ती-शक्ती समूह शिल्प चौकातून सुटणार आहे. तेथून रावेत येथील इस्कॉन मंदिर, चिंचवडगावातील मोरया गोसावी मंदिर, मंगलमूर्ती वाडा, चापेकर वाडा, चापेकर बंधू स्मारक, सायन्स पार्क, संभाजीनगरची बर्ड व्हॅली, निगडीची दुर्गा देवी टेकडी, अप्पूघर असे फिरून तीर्थक्षेत्र देहूगाव मार्गे निगडीत परतणार आहे. हे अंतर 43.50 किलोमीटर आहे.

तर, दुसरी पिंपरी-चिंचवड दर्शन बस भोसरी चौकातून सुटून आळंदीत दर्शन होणार आहे. तेथून लांडेवाडीतील शिवसृष्टी दाखविली जाणार आहे. त्यानंतर बर्ड व्हॅली, सायन्स पार्क, मोरया गोसावी मंदिर, चापेकर वाडा, मंगलमूर्ती वाडा, दुर्गादेवी टेकडी व भक्ती-शक्ती समूह शिल्प दाखविले जाणार आहे. समारोप सायंकाळी सहाला भोसरीत होणार आहे. हे अंतर 51.30 किलो मीटर आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.