Pimpri: पिंपरी-चिंचवड दर्शन बस पूर्ववत होणार; आयुक्त श्रावण हर्डीकर यांची माहिती

एमपीसी न्यूज – शहरवासियांच्या प्रतिसादाअभावी आठ दिवसातच बंद पडलेली पिंपरी-चिंचवड दर्शन ही बस पूर्ववत सुरु करणार असल्याचे महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी सांगितले. त्याबाबतचा पीएमपीएमएलकडून अहवाल मागविला आहे. त्याची जाहिरात करण्याची आवश्यकता असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

पुणे शहराच्या धर्तीवर पिंपरी-चिंचवड दर्शन बससेवा 3 ऑगस्ट 2019 पासून सुरु करण्यात आली होती. केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते बसचे उद्‌घाटन करण्यात आले होते. त्याकरिता पीएमपीएलकडून दोन वातानुकूलीत बस उपलब्ध करून दिल्या होत्या. त्याची क्षमता 32 आसनाची होती. उपशहरातील दोन मार्गावरुन या वातानुकूलीत बस धावत होत्या. प्रती व्यक्ती 500 रूपये शुल्क होते. सकाळी नऊच्या सुमारास निगडीच्या भक्ती-शक्ती समूह शिल्प चौक आणि भोसरी चौकातून बस धावत होत्या. त्यामध्ये तिर्थक्षेत्र देहू आणि आळंदीचा समावेश करण्यात आला होता.

पिंपरी-चिंचवड दर्शन ही बस केवळ आठ दिवसच चालू राहिली. या बसला नागरिकांचा प्रतिसाद मिळाला नाही. अतिशय कमी प्रतिसाद मिळाला. त्यामुळे केवळ आठ दिवसातच पिंपरी-चिंचवड दर्शन बस बंद करण्याची नामुष्की महापालिका प्रशासनावार ओढाविली. त्यानंतर तीन महिन्यांपासून ही बस बंदच आहे.

_MPC_DIR_MPU_II

याबाबत विचारले असता आयुक्त श्रावण हर्डीकर म्हणाले, ”पिंपरी-चिंचवड दर्शन बससेवेला नागरिकांचा प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे आठ दिवसात बस बंद करण्यात आली होती. ही बस पूर्ववत केली जाणार आहे. त्याबाबतचा पीएमपीएमएलकडून अहवाल मागविला आहे. त्याची जाहिरात करण्याची आवश्यकता आहे”.

या मार्गावरून धावत होत्या पिंपरी-चिंचवड दर्शन बस!
एक बस सकाळी साडेआठ वाजता निगडीच्या भक्ती-शक्ती समूह शिल्प चौकातून सुटत होती. तेथून रावेत येथील इस्कॉन मंदिर, चिंचवडगावातील मोरया गोसावी मंदिर, मंगलमूर्ती वाडा, चापेकर वाडा, चापेकर बंधू स्मारक, सायन्स पार्क, संभाजीनगरची बर्ड व्हॅली, निगडीची दुर्गा देवी टेकडी, अप्पूघर असे फिरून तिर्थक्षेत्र देहूगावमार्गे निगडीत परत येत होती. हे अंतर 43.50 किलोमीटर होते.

तर, दुसरी पिंपरी-चिंचवड दर्शन बस भोसरी चौकातून सुटून आळंदीत जात होती. तेथून लांडेवाडीतील शिवसृष्टी दाखविली जाणार आहे. त्यानंतर बर्ड व्हॅली, सायन्स पार्क, मोरया गोसावी मंदिर, चापेकर वाडा, मंगलमूर्ती वाडा, दुर्गादेवी टेकडी व भक्ती-शक्ती समूह शिल्प दाखविले जाणार आहे. समारोप सायंकाळी सहाला भोसरीत होत होता. हे अंतर 51.30 किलोमीटर आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.