Pimpri : पिंपरी-चिंचवडकरांनी अनुभवला शून्य सावली दिवस 

एमपीसी न्यूज – भरदुपारी सावली गायब होण्याचा अनुभव आज पिंपरी-चिंचवडकरांनी घेतला. ‘झिरो शॅडो डे’ (शून्य सावली दिवस) असल्याने दुपारी 12 वाजून 31 मिनिटांपर्यंत सावली नाहीशी झाली. अनेकांनी सावली गायब झाल्याची छायाचित्रे, व्हिडिओ टिपून ती सोशल मीडियावरून शेअर केली. काहींनी व्हॉटस् अ‍ॅपच्या स्टेटस् वर देखील ठेवली.

पृथ्वी सूर्याभोवती फिरता फिरता ती स्वत:भोवतीसुद्धा फिरते. ती स्वत:भोवती ज्या अक्षातून फिरते, तो अक्ष उभा नसून 23.5 अंशातून कललेला आहे; त्यामुळे सहा महिने सूर्य उत्तरेकडे सरकताना दिसतो, त्याला ‘उत्तरायण’ असे म्हणतात, तर सहा महिने तो दक्षिणेकडे सरकताना दिसतो त्याला ‘दक्षिणायन’ असे म्हणतात.उत्तरेकडे सरकताना एकदा आणि दक्षिणेकडे सरकताना एकदा असा वर्षातून दोनवेळा सूर्य बरोबर आपल्या डोक्यावर असतो. त्या वेळी तो आकाशाच्या घुमटाच्या अत्युच्य बिंदूवर असतो आणि त्याची किरणे त्या ठिकाणी लंबरूप पडतात, परिणामी कोणत्याही वस्तूची सावली बरोबर त्या वस्तूच्याच खाली पडते आणि दिसेनाशी होते. या घटनेला ‘झिरो शॅडो’ म्हणतात. त्या घटनेचा अनुभव पिंपरी-चिंचवडकरांनी आज घेतला.

आपली सावली ही कधी मागे तर कधी पुढे पडताना आपण पाहत असतो. चालताना ती कधी मागेमागे किंवा पुढे पुढे चालत असते. पण आज सावली चक्क मागे किंवा पुढेही नव्हती तर ती बरोबर शरीराच्या मध्यभागी पायाखाली पडल्याचा अनुभव शहरवासियांनी घेतला. दुपारी 12 वाजून 31 मिनिटांनी काही काळ सावली गायब झाल्याचे शहरवासीयांनी पाहिले.‘झिरो शॅडो डे’ (शून्य सावली दिन) निमित्त निसर्गाची ही वेगळीच अनुभूती पहायला मिळाली.

संपूर्ण पृथ्वीवर एकाच दिवशी शून्य सावली दिसते असे नाही. तर वेगवेगळ्या दिवशी वेगवेगळ्या भागात हा अनुभव येत असतो. मे महिन्यातच शून्य सावली दिवसाचा अनुभव घेता येतो. प्रत्येक शहराला अक्षांशानुसार वेगवेगळी वेळ दिली आहे. पुण्यामध्ये 14, 15 मे पर्यंत हा परिणाम दिसणारा आहे, असे शहरातील जाणकारांनी सांगितले.पृथ्वीवर मकर वृत्ताच्या दक्षिणेकडील भागात तर कर्कवृत्ताच्या उत्तरेकडच्या भागात सूर्य कधीही डोक्यावर येत नाही. तो सदैव क्रमश: उत्तरेकडे किंवा दक्षिणेकडेच दिसतो. परंतु, या दोन टोकांच्या वृत्तामधल्या लोकांना वर्षातून दोनदा सूर्यबरोबर डोक्यावर आलेला अनुभवायला मिळतो.

जेव्हा सूर्य बरोबर डोक्यावर असतो तेव्हा आपली सावली सरळ आपल्या पायाखाली पडते. जणूकाही सावली दिसेनाशी झाली असा काहीवेळ भास होतो. यालाच ‘शून्य सावली दिवस’ असे म्हटले जाते. या वेळी अनेकांनी कुतूहलाने आपली सावली शून्य झाली आहे की नाही, याचा अनुभव घेतला. काहीनी हा प्रयोग करून पाहिला. अनेकांना आपली सावली केवळ पायाखाली आल्याचे दिसले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.