Pimpri : गणरायाच्या आगमनासाठी बाजारपेठ गजबजली; फोल्डिंगच्या मखराला मागणी

एमपीसी न्यूज – विघ्नहर्त्या गणरायाचे आगमन आता काही दिवसांवर येऊन ठेपले आहे. या पार्श्वभूमीवर गणेशोत्सवासाठी लागणा-या विविध प्रकारच्या सजावटीच्या आकर्षक साहित्याने पिंपरी-चिंचवड शहरातील बाजारपेठा सजल्या आहेत.

लाडक्या गणपती बाप्पाच्या प्रतिष्ठापनेसाठी प्लॅस्टिकच्या फुलांच्या माळा, मोत्यांचे हार, पर्यावरणपूरक कागदी मखर, छोट्या-छोट्या दिव्यांच्या माळा, प्लॅस्टिकची फुले, हिटलॉन शीट, क्रिस्टल माळा, चायनीज माळा व फुले, फुलांचे विविध प्रकार एक ना अनेक नवनवीन प्रकार बाजारपेठेत आले आहेत.

मखरासाठी पडदयांच्या झालर, गेट कमान, छत आणि झुंबरांना विशेष मागणी आहे. यंदा बाप्पासाठी पडद्यातील फोल्डिंगच्या मखराला अधिक मागणी आहे. बाजारात आरास करण्यासाठी डिझाईन्सचे पडदे उपलब्ध आहेत. 900 रुपयांपासून अडीच हजारांपर्यंत हे विशेष फोल्डिंग मखर बाजारात उपलब्ध आहेत. सध्या गणेशोत्सवाचा रंग बहरत असताना वैविध्यपूर्ण व नावीन्यपूर्ण प्रकारांतील मखरांना नागरिकांकडून मागणी वाढली आहे. आकर्षक रंगसंगती आणि चमकणाऱ्या मखरांना गणेशभक्तांकडून पसंती मिळत आहे.

खास करुन गणपतीसाठी पडद्यातील फोल्डिंगच्या मखराला जास्त मागणी आहे. 900 रुपयांपासून ते 2500 रुपयांपर्यंत ही पडद्यांची फोल्डिंग मखर बाजारात आहेत. भगवा आणि पांढऱ्या रंगाच्या पडद्यांना विशेष मागणी आहे. यावर्षी बाजारात सध्या गणपतींच्या आरासीसाठी विविध डिझाईनचे पडदे आले आहेत. आकर्षक रंगातील आणि विविध आकारातील पडद्यांना सजावटीसाठी विशेष मागणी आहे. गणपतीच्या मखरासाठी पडद्याच्या झालर, गेट कमान, छत आणि झुंबरांना विशेष मागणी आहे. यावर्षी गणपतीच्या मखर सजावटीसाठी पडद्यांचा जास्त ट्रेंड दिसून येत असल्याचे पिंपरीतील विक्रेते महालक्ष्मी दुकानाच्या कांचन सुखवाणी यांनी सांगितले.

दरवर्षीप्रमाणे यावर्षी वेगवेगळ्या रंगसंगतीतील लहान-मोठे मखर विक्रीस आले आहेत. त्यामध्ये चौरंग, मूषकवाहक रथ, सिंहासन, कमळ यासारख्या मखरांना विशेष मागणी आहे. याशिवाय छोटी-छोटी कलात्मक झाडे, रंगीबेरंगी फुले, प्लॅस्टिकचे फुलांचे हार, तोरण यासह विविध प्रकारच्या शोभेच्या वस्तूही मुबलक प्रमाणात विक्रीस आल्या आहेत.

तसेच गणपतीसाठी खास फेटा, नक्षीकाम केलेले उपकरणे, विविध प्रकारचे हार, मोत्यांचे हार, मुकुट, रंगीत खडे आणि क्रिस्टल्सने बनविलेले आकर्षक दागिने बाजारात विक्रीसाठी आले आहेत. निसर्गप्रेमींसाठी खास इको फ्रेंण्डली मखर, सिंहासने बाजारात दाखल झाली आहेत. कापडी पिशव्यांची मखरे, लाकडी सिंहासने, नक्षीदार आरास यामुळे पर्यावरणपूरक सजावटीसाठी या वस्तूंना मोठी मागणी होत आहे. मखर 400 ते 3000 रुपये, हार 60 ते 250 रुपये, छोटी कलात्मक झाडे 25 ते 300 रुपयांपर्यंत उपलब्ध आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी सजावटीच्या साहित्याच्या किमतीमध्ये सुमारे 20 ते 25 टक्क्यांनी वाढ झाली आहे. घरोघरी गणेश आगमनाची तयारी तर सुरूच आहे, पण यावर्षी आरास कशी आकर्षक करता येईल याबाबत अनेक तरुण मंडळांमधूनही मंडप उभारणी तसेच सजावटीसाठीची तयारी सुरू झाली आहे.

   

   

   

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.