Pimpri : पुण्यासह पिंपरी चिंचवड, मावळ परिसरात पावसाच्या जोरदार सरी

वाकड परिसरात गारांचा पाऊस

एमपीसी न्यूज- पिंपरी- चिंचवड, पुणे आणि मावळ परिसरात आज संध्याकाळी सहा वाजण्याच्या सुमारास विजांच्या गडगडाटासह पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या. अचानक आलेल्या पावसामुळे दुपारपासून उकाड्याने हैराण झालेल्या शहरवासीयांना दिलासा मिळाला. दरम्यान आज पुण्याचे तापमान 40.9 अंश नोंदवण्यात आले. वाकड परिसरात गारांचा पाऊस कोसळला

आज दुपारपासूनच हवेत प्रचंड उकाडा जाणवू लागला होता. उन्हाच्या गरम झळांनी वातावरण तापले होते. दुपारी तीन वाजेपर्यंत कडक ऊन पसरले असतानाच अचानक आकाशात काळे ढग दाटून आले. विजांचा कडकडाट सुरू होऊन संध्याकाळी सहा वाजण्याच्या सुमारास वळवाचा पाऊस पडण्यास सुरुवात झाली.

  • पिंपरी, चिंचवड, भोसरी परिसरात हलक्या स्वरूपाचा पाऊस झाला तर आकुर्डी भागात पावसाची जोरदार सर येऊन गेली. अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली. पादचाऱ्यांच्या, वाहनचालकांनी आडोसा गाठला. वाकड परिसरात मात्र पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या. काही ठिकाणी गारा पडल्याचेही स्थानिक नागरिकांनी सांगितले.

आज दुपारनंतर आकाश ढगाळ राहणार असल्याची आणि महाराष्ट्रात काही ठिकाणी पावसाच्या मध्यम आणि हलक्या स्वरूपाच्या सरी कोसळणार असल्याची शक्यता पुणे वेधशाळेने वर्तवली होती.

मावळ भागातही पावसाची हजेरी

टाकवे परिसरात दुपारी साडेतीनच्या सुमारास अचानक पावसाने हजेरी लावली. ऐन उन्हात पाऊस पडत होता. वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसाबरोबरच विजांचा कडकडाट सुरु झाला. अचानक आलेल्या पावसामुळे नार्रीकांची चांगलीच तारांबळ उडाली. पावसाळ्यात जनावरांसाठी रचुन ठेवलेला चारा भिजला. पावसानंतर हवेत गारवा निर्माण होईल असे वाटत असतानाच पाऊस थांबल्यानंतर पुन्हा उकाडा सुरु झाला. आंबी, वारंगवाडी,नवलाख उंब्रे,  बधलवाडी परिसरात। वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाच्या सरी कोसळल्या.  आंदर मावळातील टाकवे, किवळे, भोयरे या ठिकाणी पाऊस पडला.

टाकवे परिसरात औद्योगिक वसाहत असल्याने कंपनी सुटण्याच्या वेळेत पाऊस सुरु झाल्यामुळे कामगार वर्गाची चांगलीच धावपळ उडाली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
HB_POST_END_FTR-A2
You might also like