Pimpri : पिंपरी चिंचवड महापालिकेच्या महापौर- उपमहापौरांची आज निवड

एमपीसी न्यूज- आज पिंपरी चिंचवड महापालिकेच्या महापौर- उपमहापौरांची आज निवड होणार असून पुणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त शांतनू गोयल यांच्या अध्यक्षतेखाली सकाळी 11 वाजता विशेष सभा बोलावण्यात आली आहे. या सभेत महापौर- उपमहापौरपदाची निवड प्रक्रिया पार पडणार आहे.

महापौरपद हे सर्वसाधारण महिला गटासाठी राखीव झालेअसून भाजपतर्फे सांगवीच्या नगरसेविका माई ढोरे यांचा तर उपमहापौरपदासाठी क्रीडासमिती सभापती तुषार हिंगे यांचा अर्ज दाखल झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडून महापौरपदासाठी दापोडीच्या नगरसेविका माई काटे तर उपमहापौरपदासाठी नगरसेवक राजू बनसोडे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

पालिकेमध्ये भाजपचे 77 नगरसेवक असून संलग्न अपक्ष 5 असे 82 संख्याबळ आहे. राष्ट्रवादीचे संख्याबळ ३६ असून शिवसेनेचे 9, मनसेचा एक असे तीनही विरोधक एकत्र आले तरीही त्यांचे संख्याबळ 46 होते. प्रत्यक्ष निवडणुकीच्यावेळी शिवसेना, मनसे काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मूळ राष्ट्रवादी काँग्रेसचे असलेले भाजपचे नगरसेवक राष्ट्रवादी काँग्रेसला मतदान करतील असा दावा केला जात आहे. मात्र प्रत्यक्ष मतदानाच्यावेळी काय घडणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

प्रथम महापौरपदासाठी निवडणूक होणार असून अर्ज माघारीसाठी 15 मिनिटांचा वेळ देण्यात येईल. अर्ज माघारी न आल्यास हात वर करून मतदान घेतले जाईल. दरम्यान, भाजप नेत्यांनी आमचा एकही नगरसेवक फुटणार नाही असा विश्वास व्यक्त केला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.