Pimpri : पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयातील कर्मचा-यांचा तीन महिन्यांचा पगार रखडला!

पोलीस कर्मचारी हवालदिल; आयुक्तालयाकडे वेतनाचे अटॅच होण्यासाठी देखील झाला विलंब

एमपीसी न्यूज – प्रशासकीय प्रक्रियांना होणा-या दिरंगाईमुळे पिंपरी-चिंचवड आयुक्तालयातील पोलीस कर्मचा-यांचे मागील तीन महिन्यांपासून वेतन रखडले आहे. कार्यालयीन कर्मचाऱ्यांकडून होणाऱ्या दफ्तर दिरंगाईमुळे पोलिस कर्मचारी आता हवालदिल झाले आहेत. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याबाबत आयुक्तालयातील ‘कार्यालयीन बाबू’ना वारंवार आदेश देऊनही पगाराचा विषय अद्याप मिटलेला नाही. त्यामुळे कार्यालयीन कर्मचारी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या आदेशाला जुमानत नसल्याचे चित्र पगाराच्या मुद्यावरून दिसून येत आहे.

पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय अडीचणींच्या गर्तेतून अद्याप बाजूला आले नाही. प्रशासकीय अडचणींसोबत आता कर्मचा-यांच्या वेतनाच्या देखील अडचणी समोर येत आहेत. 15 ऑगस्ट 2018 रोजी पिंपरी-चिंचवड शहरासाठी स्वतंत्र पोलीस आयुक्तालय झाले. शहराचा स्वतंत्र कारभार सुरु झाला. आयुक्तालयाला सुरुवातीपासूनच अनेक समस्यांना तोंड द्यावे लागले आहे. सुरुवातीला कर्मचा-यांची संख्या कमी असल्याने आयुक्तालयाच्या कारभाराला गती मिळाली नाही. त्यानंतर आयुक्तालयाला वाहनांच्या समस्येने ग्रासले. यासाठी अतिवरिष्ठ पातळीवरून देखील आयुक्तालयाला म्हणावे तेवढे सहकार्य मिळाले नाही.

  • पुणे पोलीस आयुक्तालयातून वेगळे झालेल्या आयुक्तालयाच्या प्रशासकीय बाबींसाठी दिरंगाई होत आहे. पुणे पोलीस आयुक्तालयाच्या नॉर्थ झोनकडून पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयातील अधिकारी-कर्मचारी वेतनाचे डिटॅच होण्यास विलंब झाला आहे. त्यामुळे पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाकडे वेतनाचे अटॅच होण्यासाठी देखील विलंब झाला.

दरम्यानच्या काळात कर्मचा-यांना वेतन मिळण्यास विलंब झाला. त्याचबरोबर पुणे पोलीस आयुक्तालयातील अधिकारी-कर्मचा-यांची सातव्या वेतन आयोगाची वेतन निश्चिती झाली. त्याचा वेतनातील फरक देखील कर्मचा-यांना मिळाला. मात्र, पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयातील कर्मचा-यांची अद्याप वेतन निश्चिती देखील झाली नाही.

  • काही कर्मचा-यांची मागील पाच ते सहा वर्षांपासून इन्क्रिमेंट देखील रखडली आहे. पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय नवीन असल्याने अडचणी येणे साहजिक असले तरी मागील पाच ते सहा वर्षांपासून इन्क्रिमेंट न झाल्यामुळे पोलीस कर्मचारी पुरते वैतागले आहेत. नवीन आयुक्तालयात राज्यभरातून पोलीस कर्मचा-यांनी बदली करून घेतली. बाहेरून आलेल्या सर्वांनीच शहरात भाड्याने राहण्याची व्यवस्था केली आहे. वेतन रखडल्याने घरभाडे देण्यापासून अन्य सगळ्याच अडचणींचा कर्मचा-ना सामना करावा लागत आहे.

सहाय्यक पोलीस आयुक्त श्रीधर जाधव म्हणाले, “पुणे पोलीस आयुक्तालयातून वेगळ्या झालेल्या पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाचे डिटॅच-अटॅच होण्यासाठी विलंब झाल्याने कर्मचा-यांच्या वेतनाची अडचण होती. नऊ पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांचे वेतन रखडले होते. सोमवारी त्या सर्व पोलीस ठाण्याचे वेतन झाले आहे. अपवादात्मक स्थितीत काही कर्मचा-यांचे वेतन राहिले आहे. त्याबाबत प्रशासकीय पातळीवर पाठपुरावा सुरु आहे. कर्मचा-यांचा पाचवा आणि सहावा वेतन आयोगाचा फरक देखील आताच्या वेतनासोबत कॅरी फॉरवर्ड केला आहे. अपवादात्मक स्थितीत राहिलेल्या कर्मचा-यांचेही वेतन आज (मंगळवारी) होईल.

वेतन रखडल्याने पोलीस कर्मचा-यावर विवाहासाठी उसनवारीची वेळ
पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयातील एका पोलीस कर्मचा-याचा येत्या 19 मे रोजी विवाह आहे. विवाहासाठी त्यांनी सुट्टी घेतली. सुट्टी सुरु देखील झाली. मात्र, मागील तीन महिन्यांपासून वेतन न झाल्याने बस्ता, मंडप, आचारी असे लग्नाचे अनेक व्यवहार रखडले. लग्न ऐन चार दिवसांवर येऊन ठेपले आहे. मात्र, वेतन न झाल्याने उसनवारी करून विवाहसाठी खर्च करावा लागत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.