Pimpri : पिंपरी-चिंचवडकरांनो, स्वयंस्फूर्तीने जनता कर्फ्यू पाळा – आयुक्त श्रावण हर्डीकर

Pimpri-Chinchwad residents voluntarily follow public curfew - Municipal Commissioner

एमपीसीन्यूज : पिंपरी चिंचवड शहरात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. या आठवड्यात सलग तीन दिवस उच्चांकी रुग्ण संख्या होती. त्यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे. कोरोना विषाणूंचा संसर्ग रोखण्यासाठी पिंपरी-चिंचवड शहरवासीयांनी रविवार आणि गुरुवारी स्वयंस्फूर्तीने जनता कर्फ्यू पाळावा, असे आवाहन महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी केले आहे.

कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या संख्येत वाढ झाल्याने महापालिका रुग्णालयातील खाटा कमी पडत आहेत. त्यामुळे पॉझिटिव्ह असलेल्या मात्र कोरोनाची लक्षणे नसलेल्या रुग्णांना घरीच आयसोलेट होण्याचा सल्ला महापालिका प्रशासनाकडून दिला जात आहे.

असे असले तरी बहुतांश नागरिकांची घरी आयसोलेट होण्याची व्यवस्था नाही. त्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करून घेणे भाग पडत आहे. परिणामी रुग्णालयांची क्षमता संपली आहे. त्यासाठी शहरातील काही ठिकाणी आणखी नवीन केंद्र उभारून तेथे कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचाराची सुविधा उपलब्ध करून देण्याचे नियोजन आहे.

मात्र, तरीही शहरात दररोज मोठ्या संख्येने कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळत आहेत. ही संख्या कमी करण्याबाबत प्रशासनाकडून विविध उपाययोजना केल्या जात आहेत.

तथापि, प्रशासनाच्या आवाहनाकडे दुर्लक्ष करून काही नागरिक विनाकारण घराबाहेर पडत आहेत. काही ठिकाणी फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन होत नाही. तसेच कन्टेन्मेंट झोनमध्ये देखील निर्बंधांकडे दुर्लक्ष केले जाते. परिणामी कोरोना विषाणूंचा संसर्ग होण्यास मदत होत आहे.

हे प्रकार थांबवून नागरिकांनी रविवार आणि गुरुवारी स्वयंस्फूर्तीने जनता कर्फ्यू पाळावा, असे आवाहन आयुक्त हर्डीकर यांनी केले आहे. मास्क, फेसशिल्ड, सॅनिटायझर यासह सुरक्षा साधनांचा नागरिकांनी वापर करावा, दुकाने, गर्दीच्या ठिकाणी रेंगाळू नये, फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करावे, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.