Pimpri: भाजपच्या राजवटीत पिंपरी-चिंचवडची दुरवस्था – योगेश बहल

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेत भाजपची सत्ता आल्यापासून शहराची दुरवस्था झाली आहे. पवना धरण भरले तरीही लोकांना पाण्यासाठी ओरड करावी लागत आहे. कच-याचा प्रश्न गंभीर झाला आहे. याचा राग मतदारांनी मतदानातून व्यक्त करावा असे आवाहन माजी महापौर योगेश बहल यांनी केले.

पिंपरी विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस- काँग्रेस मित्र पक्ष आघाडीचे उमेदवार माजी आमदार अण्णा बनसोडे यांच्या प्रचारासाठी प्राधिकरणातील खान्देश सभागृह येथे आयोजित बैठकीत माजी महापौर बहल बोलत होते.

_MPC_DIR_MPU_II

यावेळी राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे, महिला अध्यक्षा वैशाली काळभोर, माजी उपमहापौर राजू मिसाळ, माजी नगरसेवक उल्हास शेट्टी, प्रसाद शेट्टी, निलेश पांढारकर तसेच श्रीमंत जगताप, सचिन काळभोर, संजय लंके, अमोल भोईटे, रामभाऊ तावरे आदी उपस्थित होते.

बहल म्हणाले की, भाजपच्या वतीने 370वे कलम रद्द केल्याचा गाजावाजा केला जात आहे. अवघ्या देशाने त्याचे स्वागतही केले आहे. मात्र, त्यामुळे देशातील अन्य प्रश्नांकडे दुर्लक्ष होता कामा नये. शाहू, फुले, आंबेडकर यांच्या विचारांचा वारसा घेऊन वयाच्या 80 व्या वर्षी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी महाराष्ट्र पिंजून काढला आहे. त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी व राज्यात सक्षम सरकार देण्यासाठी पिंपरी मतदारसंघातून बनसोडे यांना विजयी करण्याचे आवाहन बहल यांनी केले.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस- काँग्रेस मित्र पक्ष आघाडीचे उमेदवार माजी आमदार अण्णा बनसोडे यांच्या प्रचारार्थ शाहुनगर तसेच संभाजीनगर, एचडीएफसी कॉलनी परिसरात माजी महापौर मंगला कदम यांच्या नेतृत्वाखाली पदयात्रा काढून पत्रकांचे वाटप करण्यात आले. यावेळी युवा नेते कुशाग्र कदम परिसरातील कार्यकर्ते उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.