Pimpri : पिंपरी चिंचवड अप्पर तहसील कार्यालयाकडून गरजुंना मदतीचा हात

एमपीसी न्यूज : कोरोनामुळे सध्या संपूर्ण देश लॉकडाऊनने बंद आहे. अशावेळी हातावर पोट असलेल्या व रोजंदारीवर आपला उदरनिर्वाह करणाऱ्या कुटुंबांचे प्रचंड हाल होत आहेत. अशा अनेक कुटुंबांना पिंपरी चिंचवड अप्पर तहसील कार्यालयातील तहसिदारांसह अधिकारी व कर्मचाऱ्यांनी स्व:खर्चातून जीवनावश्यक साहित्याची मदत केली.

कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी शासकीय यंत्रणा दिवसरात्र कार्यरत आहे. शासकीय पातळीवर आपल्या जबाबदाऱ्या पार पाडत असताना स्व:खर्चातूनही गोरगरीब नागरिक, निराधार, रोजंदारीवर काम करणारे मजूर अशा लोकांना जीवनावश्यक साहित्य मदत म्हणून देण्याचा निर्णय पिंपरी चिंचवड अप्पर तहसील कार्यालयातील सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी घेतला.

त्यानंतर तहसिलदार गीता गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली १ एप्रिलपासून प्रत्यक्ष मदत पोहोचविण्यास सुरुवात करण्यात आली. प्रामुख्याने तहसील कार्यालयाच्या हद्दीतील गोरगरिबांना ही मदत पोहोचविण्यात आली. १ एप्रिल ते ४ एप्रिल या कालावधीत एकूण ८१९ कुटुंबातील ३३९५ नागरिकांपर्यंत जीवनावश्यक साहित्य वाटप करण्यात आले.

या साहित्यामध्ये तूरडाळ, पीठ, तांदूळ, मुगडाळ, गोडेतेल, मीठ, गहू, अल्पोपहार,  चहा,  बिस्कीट, आणि पाणी बॉटल आदी दैनंदिन गरजेच्या वस्तूंचा समावेश होता. संकट काळात मदत मिळाल्याने गोरगरिबांकडून महसूल खात्यातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे आभार मानण्यात आले.

तहसिदार गीता गायकवाड यांच्यासह मंडलाधिकारी गणेश सोमवंशी, तलाठी स्वप्नील पतंगे, अतुल गीते, संदीप शिंदे, अश्विनी होडगे, अर्चना रोकडे, अजय चडचणकर, मारुती पवार, रश्मी गलपेल्ली आदींनी या मदत कार्यात सहभाग घेतला.

 

एकीकडे कोरोनाचे भय, तर दुसरीकडे लॉकडाऊन, यामुळे गोरगरीब नागरिकांसमोर मोठे संकट उभे ठाकले आहे. अन्नपाण्यावाचून त्यांचे हाल होत असल्याचे लक्षात येताच आमच्या कार्यालयातील मंडलाधिकारी, तलाठी आणि अन्य कर्मचाऱ्यांनी सामाजिक बांधिलकीच्या भावनेने त्यांना मद्त करण्याचा निर्णय घेतला. मग प्रत्येकाने ठराविक वर्गणी काढून जीवनावश्यक साहित्य गोरगरिबांपर्यंत पोहोच केले. या मदत कार्यातून वेगळेच समाधान लाभले. गीता गायकवाड – तहसिदार.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.