Pimpri: पाणीपुरवठ्याच्या कामांसाठी 1200 कोटींची कामे प्रस्तावित, गरज पडल्यास कर्जरोखे उभारणार – आयुक्त हर्डीकर

'आंद्रा’च्या प्रकल्पाची महिनाअखेर पर्यंत निविदा

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहराची दिवसेंदिवस वाढणारी पाण्याची गरज भागविण्यासाठी तात्काळ पावले उचलली जाणार आहेत. आंद्रा धरणातून शंभर एमएलडी पाणी उचण्याच्या प्रकल्पाची निविदा या महिनाअखेर काढण्यात येणार आहे. याशिवाय शहरात दोन ठिकाणी सांडपाण्यावर प्रक्रिया करणारे दोन प्रकल्प उभे केले जाणार आहेत. या कामांसाठी अंदाजे बाराशे कोटी रुपयांचा खर्च येणार आहे. हे प्रकल्प शहराच्या दृष्टीने महत्त्वाचे असल्याने वेळेत पूर्ण करण्यासाठी पैशांची कमतरता भासल्यास वेळप्रसंगी कर्जरोखे उभारून पैशांची पूर्तता केली जाईल, अशी माहिती आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी दिली.

पिंपरी-चिंचवड सध्या शहरात पाण्याची टंचाई निर्माण झाल्यामुळे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. अनियमित, कमी दाबाने आणि विस्कळीत पाणीपुरवठ्यामुळे रहिवाशी हैराण आहेत. समन्यायी पाणी पुरवठा करण्यासाठी महापालिका प्रशासनाने सोमवारपासून एक दिवसाआड पाणी पुरवठा करण्याचे धोरण जाहीर केले आहे. याबाबत माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत भविष्यातील महापालिकेच्या पाणीपुरवठ्यासंदर्भातील विविध प्रकल्पांची माहिती आयुक्तांनी दिली.

या प्रकल्पांबाबत माहिती देताना आयुक्त म्हणाले, “रावेत बंधार्‍यातून सध्या पाचशे एमएलडी पाणी उचलले जात आहेत. शहराची पाण्याची गरज लक्षात घेता नवे स्त्रोत निर्माण करण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी महापालिकेच्या वतीने एक एकर जागा पाहून तात्काळ नव्याने एक जलशुद्धीकरण केंद्र उभारले जाणार असून वाढीव विजेसाठी इलेक्ट्रीसीटीचीही सोय केली जाणार आहे. रावेत बंधार्‍यातून वाढीव पाणी उचलण्यासाठी उपाययोजना करण्याबरोबरच इतरही अनेक उपाययोजना हाती घेण्यात आल्या आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने आंद्रा धरणातून शंभर एमएलडी पाणी उचलण्याचा प्रकल्प सुरू करण्यात येणार आहे”

शहराच्या लोकसंख्या वाढीचा वेग हा प्रचंड आहे. सध्याची लोकसंख्या ही 27 लाखांवर पोहोचली असून 2041 ला गृहीत धरलेली लोकसंख्या येत्या पाच ते सात वर्षांतच पूर्ण होईल. त्यामुळे वाढत्या लोकसंख्येची गरज लक्षात घेऊन हे प्रकल्प हाती घेण्यात आले आहेत. चालू महिनाअखेर आंद्रा धरणातून पाणी उचलण्याच्या प्रकल्पाची निविदा काढण्यात येणार असून त्यासाठी 238 कोटी रुपयांचा खर्च येणार आहे. याशिवाय शहरात नव्याने 27 पाण्याच्या टाक्या उभारण्यात येणार आहेत. त्या अनुषंगिक व इतर पाणीपुरवठ्याची कामे करण्यासाठी सहाशे कोटी रुपयांचा खर्च येणार आहे.

याशिवाय सांडपाण्यावर प्रक्रिया करून या पाण्याचा पुनर्वापर करण्यासाठी दोन ठिकाणी प्रकल्प उभे केले जाणार आहेत. कासारवाडी येथे 75 एमएलडीचा तर चर्‍होली येथे 5 एमएलडीचा प्रकल्प उभारला जाणार आहे. औद्योगिक अस्थापना तसेच इतर ठिकाणी पुनर्वापराचे पाणी पुरविण्याचा मानस असून त्यासाठी साडेपाचशे ते सहाशे कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. पाणी पुरवठ्याची गरज लक्षात घेऊन हे सर्व प्रकल्प तात्काळ मार्गी लावणे गरजेचे आहे. महापालिकेची सध्याची आर्थिक परिस्थिती हे प्रकल्प पूर्ण करण्यासाठी सक्षम आहे. मात्र, हे प्रकल्प उभारण्यासाठी गरज पडल्यास केंद्र शासनाच्या माध्यमातून कर्जरोखे उभारण्याची तरतूदही करण्यात येणार आहे. कर्जरोख्यांच्या माध्यमातून दोन टक्के दराने निधी उपलब्ध होणार आहे. वेळेत आणि तात्काळ प्रकल्प मार्गी लावण्यासाठी सर्व उपाययोजना केल्या जातील, असेही आयुक्त यावेळी म्हणाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.