Pimpri : पवना धरणातील पाणीसाठ्यात होतेय झपाट्याने घट

दहा दिवसात चार टक्के पाणीसाठा झाला कमी

एमपीसी न्यूज – कडक उन्हाच्या बाष्पीभवनामुळे आणि पाण्याच्या होणा-या अतिवापरामुळे पिंपरी-चिंचवडकरांची तहान भागविणा-या पवना धरणातील पाणीसाठा झपाट्याने घटू लागला आहे. गेल्या दहा दिवसात धरणातील चार टक्के पाणीसाठा कमी झाला आहे. आजमितीला धरणात 38.54 टक्के पाणीसाठा असून 10 जूनपर्यंत पुरेल एवढाच हा पाणीसाठा आहे.

मावळातील पवना धरणातून पिंपरी-चिंचवड शहर आणि मावळ परिसरातील भागाला पाणीपुरवठा केला जातो. रावेत बंधा-यातून पाणी उपसा करुन महापालिकेतर्फे शहरवासियांना पाणीपुरवठा केला जातो. धरणात आजमितीला 38.54 टक्के पाणीसाठा असून हा साठा गतवर्षीपेक्षा 8 टक्के कमी आहे. हा पाणीसाठा 10 जूनपर्यंत पुरेल एवढाच मर्यादित आहे. गतवर्षी आजच्या तारखेला धरणात 46.17 टक्के पाणीसाठा होता. ‘स्कायमेटने’ सरासरीपेक्षा पाऊस कमी होण्याचा अंदाज आणि मान्सून येण्यास विलंब होण्याची शक्यता वर्तविली आहे. त्यामुळे पावसाने ओढ दिल्यास शहरवासियांना पाणी टंचाईला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिका कोट्यापेक्षा अधिक पाणीउपसा करत होती. महापालिकेला एका दिवसाला 440 एमएलडीच पाणी उपसा करण्याची मर्यादा दिली होती. परंतु, शहरातील पाणीपुरवठा विस्कळीत होत असल्याने महापालिकेकडून 500 एमएलडी पाण्याचा उपसा केला जात होता. त्यामुळे धरणातील साठा कमी होत असल्याने 4 ऑक्टोबर 2018 रोजी कालवा समितीच्या झालेल्या बैठकीत महापालिकेला 10 टक्के पाणीकपात करण्याचे सक्त निर्देश दिले होते. परंतु, महापालिकेने पाणीकपात करण्यास विलंब केला. परिणामी, धरणातील साठा कमी होत गेला.

पिंपरी महापालिकेने 1 मार्च 2019 पासून पाणीकपात सुरु केली आहे. आठ दिवसातून विभागनिहाय एक दिवस पाणीपुरवठा बंद ठेवला जात आहे. तरी देखील धरणातील पाणीसाठ्यात झपाट्याने घट होत आहे. गेल्या दहा दिवसात धरणातील चार टक्के पाणीसाठा कमी झाला आहे. 25 मार्च रोजी धरणात 42 टक्के पाणीसाठा होता. आज पाच एप्रिल 38 टक्के पाणीसाठा आहे. एप्रिल आणि मे महिन्यात तापमान जास्त राहिल्यास पाणीसाठा आणखी कमी होऊ शकतो.

पवना धरणाचे शाखा अभियंता ए.एम. गडवाल म्हणाले, ”पवना धरणात आजमितीला 38.54 टक्के पाणीसाठा असून गतवर्षीपेक्षा 8 टक्के हा पाणीसाठा कमी आहे. 10 जूनपर्यंत पुरेल एवढाच मर्यादित साठा आहे. पिंपरी महापालिकेने मध्यंतरी कोट्यापेक्षा अधिक पाणी उचलले. पाणीकपात करण्यास विलंब केला. महापालिकेला आणखीन पाणीकपात करण्याची आवश्यकता आहे. बाष्पीभवनामुळे देखील धरणातील साठा कमी होत आहे. त्यामुळे महापालिकेने पाण्याचा वापर कमी करणे आवश्यक आहे”

आजमितीला पवना धरणाची काय आहे परिस्थिती ?

पिंपरी-चिंचवडकरांची तहान भागविणारे पवना धरण यंदा ऑगस्ट महिन्यात 100 टक्के भरले होते. परंतु, त्यानंतर पावसाने ओढ दिली. परतीच्या पावसाने देखील दडी मारली. परिणामी, नदीपात्राऐवजी पावसाळ्यातच धरणातून पाणी उपसा करावा लागला. त्यामुळे धरणातील साठा कमी होत गेला. आजमितीला धरणात 38.54 टक्के पाणीसाठा आहे. हा पाणीसाठा 10 जूनपर्यंत पुरेल एवढाच मर्यादित आहे. गतवर्षी आजच्या तारखेला पवना धरणात 46.17 टक्के पाणीसाठा होता. म्हणजेच यंदा गतवर्षीपेक्षा धरणात तब्बल 8 टक्के पाणीसाठा कमी आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.