Pimpri: पाणी, दिवाबत्ती, आरोग्याच्या सक्षम सुविधेमुळे पिंपरी-चिंचवडकरांनाचा ‘लॉकडाऊन’ झाला सुसह्य!

हर्डीकर प्रशासनाकडून उत्तम नियोजन ; नागरिकांच्या तक्रारींचे प्रमाण कमी

एमपीसी न्यूज – ‘लॉकडाऊन’मध्ये पिंपरी-चिंचवड महापालिकेने यंत्रणा सक्षमपणे राबविली. अतिशय उत्तम नियोजन करत पाणी, दिवाबत्ती, झाडलोट, नियमित कचरा उचलून दररोज शहर स्वच्छ ठेवले. नागरिक घरी असल्याने पाण्याचा अधिकचा वापर असतानाही पाणीपुरवठा सुरळीत ठेवला. पाच हजार स्वच्छता कर्मचारी रस्त्यावर आहेत. महापालिकेने चांगली यंत्रणा राबविल्याने  नागरिकांना  ‘लॉकडाऊन’ देखील सुसह्य झाला आहे. उत्तम नियोजन केल्यानिमित्त हर्डीकर प्रशासनाचे कौतुक होत आहे.

कोरोनाचा संसर्ग होऊ नये, यासाठी देशभरात 25 मार्चपासून लॉकडाऊन सुरु असून, तो 14 एप्रिलपर्यंत  आहे. त्यामुळे नागरिक घरी आहेत. या काळात महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी  अचूक  नियोजन केले. चांगली यंत्रणा राबविली. पाणी, आरोग्य, दिवाबत्ती या मूलभूत सुविधांना प्राधान्य दिले. या अचूक नियोजनामुळे नागरिकांना ‘लॉकडाऊन’ सुसह्य झाला आहे. कोणताही त्रास झाला नाही. मनुष्यबळ कमी असतानाही व्यवस्थित नियोजन केल्याने हर्डीकर प्रशासनाचे कौतुक होत आहे.

शहरात मागील काही दिवसांपासून पाण्याची समस्या होती. ऐन उन्हाळ्यात नागरिकांना पाणी टंचाईला सामोरे जावे लागले असते. परंतु, लॉकडाऊनच्या काळात प्रशासनाने केलेल्या नियोजनामुळे सुरळीत पाणीपुरवठा होत आहे. तक्रारींचे प्रमाण अतिशय नगण्य आहे.  लॉकडाऊनमुळे नागरिक घरी आहेत. पाण्याचा जास्त वापर होत आहेत. उन्हाळा असतानाही पाण्याच्या तक्रारी कमी करण्यात पाणीपुरवठा विभागाला यश आले आहे. पाणीपुरवठा विभाग अतिशय नियोजनपुर्वक काम करत आहे.

कोरोनाचे संक्रमण रोखण्यासाठी स्वच्छता अतिशय महत्त्वाची आहे. या परिस्थितीत देखील महापालिकेचे पाच हजार  स्वच्छता  कर्मचारी आपल्या जीवाची पर्वा न करता काम करत आहेत. संपूर्ण शहराची झाडलोट,  दररोजचा कचरा उचलणे, औषध फवारणीची कामे केली जात आहेत. कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण,  ‘होम क्वारंटाईन’ करण्यात आलेल्या व्यक्तींच्या रहिवासी जागेची तसेच आजूबाजूच्या परिसराचे निर्जंतुकीकरण केले जात आहे. शहर स्वच्छ ठेवत स्वच्छता कर्मचारी आपली काळजी घेत आहेत.  त्यामुळे स्वच्छता  दूतांचे सर्वत्र कौतुक केले जात आहे. दिवाबत्तीच्याही तक्रारी कमी झाल्या आहेत. आपत्तीच्या काळात मुलभूत सुविधांची कमतरता जाणवली नाही. अन्यथा नागरिकांनी ओरड केली असती; मात्र आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी मुलभूत सुविधा सक्षमपणे पुरविण्यावर भर दिला. पाणी, दिवाबत्ती, दररोज कचरा उचलला जात असल्याने नागरिकांच्या तक्रारींचे प्रमाण कमी झाले आहे.

”लॉकडाऊनमध्ये पाणी वितरणाचे व्यवस्थित नियोजन केले. पाणी सोडण्याच्या वेळांची काटेकोर अमंलबजावणी केली. नागरिक घरी असून आणि पाण्याचा वापर जास्त असतानाही नियोजानमुळे  पाण्याच्या तक्रारी कमी झाल्या आहेत. ज्या भागातील तक्रार येईल, ती तक्रार तत्काळ निकाली काढली जात आहे. एकदिवसाआड पाणीपुरवठ्यामुळे उन्हाळ्यात देखील पाण्याची तक्रारी कमी आहे. नागरिकांना मुबलक पाणी मिळत आहे. पाणी सोडणा-या महापालिका, ठेकेदारांच्या मजुरांची काळजी घेतली जात आहे”.  मकरंद निकम  : सह शहर अभियंता, पाणीपुरवठा विभाग. 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.