Pimpri: पिंपरी-चिंचवडकर अतिसार, पोटदुखीने त्रस्त; पाणीपुरवठा विभागाकडे हजारो तक्रारी

Pimpri-Chinchwadkar suffering from diarrhea, abdominal pain; Thousands of complaints to the water supply department:पिंपरी-चिंचवडकर अतिसार, पोटदुखीने त्रस्त; पाणीपुरवठा विभागाकडे हजारो तक्रारी

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहराच्या विविध भागांतील नागरिक मागील दोन दिवसांपासून अतिसार आणि पोटदुखीच्या आजाराने त्रस्त आहेत. त्यामुळे दवाखान्यांमध्ये अतिसार, पोट दुखीचे रुग्ण वाढत आहे. अशुद्ध पाणी पुरवठ्यामुळे हा त्रास होत असावा, या शक्यतेने शहरातील नागरिकांकडून महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडे तक्रारी केल्या जात आहेत.

गेल्या काही दिवसांपासून शहरातील विविध भागांत अतिसार आणि पोटदुखीचे आजार उद्भवत आहेत. निगडी, भोसरी, दिघी, रुपीनगर, चिंचवड, शाहूनगर, पिंपरी, तळवडे, संभाजीनगर, बोपखेल, सांगवी, निगडी- प्राधिकरण, संत तुकारामनगर अशा 45 ठिकाणी मोठ्या प्रमाणात हा आजार पसरला आहे.

या भागांतून शेकडो नागरिकांनी महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाकडे तक्रारी केल्या आहेत.

नागरिकांच्या तक्रारी प्राप्त झाल्यामुळे पाणी पुरवठा विभागाने सुरवातीला पाण्यातील क्लोरिनच्या प्रमाणाची तपासणी केली. या तपासणीमध्ये पाण्यामध्ये क्लोरिनचे प्रमाण योग्य असल्याचे निष्पन्न झाले.

त्यानंतर तक्रारी असणाऱ्या 45 भागांतील पाण्याचे नमुन्यांची अणुजीव तपासणी केली. या तपासणीतही शहरातील पाण्यात कोणत्याही प्रकारचे जीवाणू नसल्याचे स्पष्ट झाले.

दरम्यान, शहरात शुद्धपाण्याचा पुरवठा होत असला तरी एवढ्या मोठ्या प्रमाणात पोटदुखीचे रुग्ण कसे वाढत आहेत, याबाबत नागरिक चिंता व्यक्त करत आहेत.

याबाबत पाणीपुरवठा विभागाचे सहशहर अभियंता रामदास तांबे म्हणाले, ”शहरातील पाण्याची तपासणी करण्यात आली आहे. शहरातील पाणी शुद्ध आणि सुरक्षित आहे. पाण्यात कोणत्याही प्रकारचा दुषीत घटक नाही”.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.