Pimpri : महानगरपालिकेच्या सल्लागारामुळे होतेय पिंपरी चिंचवडकरांच्या पैशाची लूट – नाना काटे यांचा आरोप

एमपीसी न्यूज – पिंपरी चिंचवड महानगरपालिका हद्दीतील विविध प्रकल्पांचा आराखडा-निविदा तयार करण्याचे तांत्रिक कौशल्याचे काम तज्ञ सल्लागारांकडून करून घ्यायचे आणि काटेकोरपणे तपासून प्रकल्प मार्गी लावायचे, असे अपेक्षित असताना महानगरपालिकेचे सल्लागार संबंधित प्रकल्पाचा खर्च फुगवून महानगरपालिकेची पर्यायाने पिंपरी चिंचवडकरांनी कररुपी भरलेल्या पैश्यांची लूट करीत असल्याचा घणाघात नगरसेवक विठ्ठल उर्फ नाना काटे यांनी केला आहे.

यासंदर्भात नगरसेवक काटे यांनी महापालिका आयुक्त श्रावण हार्डीकर यांना निवेदन दिले असून स्मार्ट सिटी अंतर्गत पिंपळे सौदागर आणि पिंपळे गुरव परिसरात करण्यात कोणकोणत्या विकासकामांची तपासणी केपीएमजी या सल्लागाराने केली आहे. याचा अहवाल सादर करण्याची मागणी या निवेदनात करण्यात आली आहे.

_MPC_DIR_MPU_II
  • दरम्यान, स्ट्रॉम वॉटर लाईनद्वारे वाया जाणाऱ्या पावसाच्या पाण्याच्या मुद्द्यावरही नाना काटे यांनी आक्षेप घेतला असून. पावसाच्या पाण्याचे योग्य नियोजन लावण्यासाठी रेन हार्वेस्टिंग सिस्टीम करून पावसाचे पाणी जमिनीत मुरवणे आवश्यक असताना ते पाणी स्ट्रॉम वॉटर लाईनच्या माध्यमातून नद्या नाल्यांमध्ये सोडणे म्हणजे पाण्याचा अपव्यय असून यासंदर्भात महापालिका सल्लागार असलेल्या केपीएमजी यांनी चुकीचा सल्ला महापालिकेला दिला आहे.

तसेच पिंपळे सौदागर परिसरात आवश्यकता नसतानाही रस्त्याच्या मधोमध मोठ्या व्यासाच्या पाईपलाईन टाकून केवळ निवेदेतील रक्कम वाढवून त्यामाध्यमातून तब्बल 60 कोटी रुपयांचा अनावश्यक खर्च महानगरपालिकेच्या माथी मारण्याचे काम सल्लागार करत आहेत. त्यामुळे स्ट्रॉम वॉटर लाईनच्या कामात त्या निवेदेची रक्कम कमी करून रचनेत बदल करण्याचे आदेश संबंधित शहर अभियंता, प्रकल्प अभियंता आणि सल्लागार यांना देण्यात यावेत, अशी मागणी नगरसेवक नाना काटे यांनी आयुक्त यांच्याकडे केली आहे.

  • या निवेदनात नाना काटे यांनी सल्लागारांच्या कामकाजावर आक्षेप नोंदवला आहे. केपीएमजी या सल्लागाराने शहरात टाकण्यात आलेल्या जेएमएनएनआरयुएममधील स्ट्रॉम वॉटर लाईनची तपासणी केली आहे का? याचा अहवाल द्यावा, स्ट्रॉम वॉटर लाईनच्या कामाचा तसेच स्मार्ट सिटी अंतर्गत केंद्र सरकारने मंजूर केलेल्या विकासकामांचा प्रोजेक्ट रिपोर्ट सादर करावा, स्मार्ट सिटीच्या मे.शिर्के इन्फ्रास्ट्रक्चर या कंपनीला मिळालेल्या कामाचा सल्लागाराने तयार केलेल्या डीपीआरची प्रत देण्यात यावी, इत्यादी मागण्या नाना काटे यांनी आयुक्त यांच्याकडे निवेदनामार्फत केल्या आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.