Pimpri: पिंपरी-चिंचवडकरांची ऑनलाईन कर भरण्यास पसंती; मोबाईल, स्मार्ट अँप, डिजिटलमुळे व्यवहारात आली सुलभता

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरातील मालमत्ताधारकांनी मागील आर्थिक वर्षात ऑनलाइन कर भरून डिजिटल व्यवहारास पसंती दिली आहे. एक लाख 60 हजार 231 मालमत्ताधारकांनी तब्बल 198 कोटी 66 हजार 69 रुपयांच्या कराचा ऑनलाईन भरणा केला आहे. तर, एक लाख 9 हजार 526 मालमत्ताधारकांनी रोख स्वरुपात 97 कोटी 46 लाख 74 हजार 606 रुपयांचा भरणा केला आहे. दरम्यान, चालू आर्थिक वर्षात लॉकडाऊनमुळे ऑनलाईन कराचा भरणा वाढण्याची शक्यता आहे.

पिंपरी-चिंचवडनगरीची लोकसंख्या सुमारे 27 लाखांवर पोहोचली आहे. केंद्र सरकारच्या जवाहरलाल नेहरु राष्ट्रीय नेहरु पुनरुत्थान अभियानांतर्गंत (जेएनएनयुआरएम) शहरात मोठ्या प्रमाणावर विकास कामे झाली आहेत. सुसज्ज रस्ते, उड्डाणपूल शहराची ओळख बनली आहे. येथील पायाभूत सोयी-सुविधा, महापालिकेने उभारलेल्या वैविध्यपूर्ण प्रकल्पांमुळे हा परिसर मालमत्ताधारकांच्या दृष्टीने आकर्षणाचा केंद्रबिंदू झाला आहे. त्यामुळे दरवर्षाला शेकडो मालमत्तांची भर पडत आहे. पर्यायाने महापालिकेचा मालमत्ताकर भरणा वाढला आहे.

1 एप्रिल 2019 ते 31 मार्च 2020 या आर्थिक वर्षात 5 लाख 27 हजार 338 पैकी 3 लाख 10 हजार 461 जणांनी मिळकतकराची बिले मुदतीमध्ये भरली आहेत. त्यात सर्वाधिक 1 लाख 60 हजार 231 जणांनी घरबसल्या ऑनलाइन बिलांचा भरणा केला आहे. या माध्यमातून तब्बल 198 कोटी 66 लाखांचा भरणा पालिकेच्या तिजोरीत झाला आहे. हे प्रमाण एकूण वसुलीच्या 51 टक्के आहे. रोखीने बिल भरणाऱ्या करदात्यांची संख्या 1 लाख 9 हजार 526 आहे. त्यादारे एकूण 97 कोटी 46 लाख 74 हजार रूपये भरले गेले आहेत. रोखीने जमा झालेल्या रकमेपेक्षा ऑनलाईनचा भरणा तब्बल 100 कोटींनी अधिक आहे.

महापालिकेने ऑनलाइन भरणा पद्धत 2009-10 साली सुरु केली. पहिल्या वर्षी केवळ 3 हजार 835 जणांनी ऑनलाइन भरणा केला होता. दुसऱ्या वर्षी 2010-11 मध्ये 9 हजार 338, तिसऱ्या वर्ष 2011-12 मध्ये 15 हजार 783, चौथ्या वर्षी 2012-13 ला 28 हजार 966 आणि पाचव्या वर्षी 2013-14 ला 40 हजार 529 जणांनी ऑनलाईनद्वारे भरणा केला. नागरिकांचा ऑनलाईनला प्रतिसाद वाढतच गेला. 2017-18 ला तब्बल 1 लाख 24 हजार 592 जणांनी ऑनलाईन कर भरण्याला पसंती दिली. तर, 2019-20 या वर्षात एक लाख 60 हजार 231 मालमत्ताधारकांनी ऑनलाईन कर भरला.

यंदा ऑनलाऊन कर भरणा-यांची संख्या दीड लाखांच्या पुढे गेली आहे. मोबाईल,स्मार्ट अँप, डिजिटल व्यवहारात आलेली सुलभता आदींमुळे नागरिक घरबसल्या ऑनलाईन कर भरण्यास पसंती देत आहेत. याशिवाय डिजिटल व्यवहारांची संख्या वाढली आहे. त्यामुळे ऑनलाईन कराचा भरणा अधिक होत असल्याचे करसंकलन विभागाने सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.