Pimpri : ‘उरी’ चित्रपट पाहून पिंपरी-चिंचवडमधील तरुणाईने कारगिल युद्धाच्या आठवणींना दिला उजाळा

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहर भाजपच्या वतीने 26 जुलै हा दिवस ‘कारगिल दिवस’ म्हणून शहरात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. त्याचप्रमाणे शहरातील पाच चित्रपटगृहांमध्ये शासनाच्या वतीने ‘उरी द सर्जिकल स्ट्राइक’ हा चित्रपट मोफत दाखवण्यात आला. चित्रपट सुरू होण्यापूर्वी चिंचवड येथील बिग सिनेमा चित्रपटगृहात कारगिल युद्धात सहभागी असलेले युद्धवीर निवृत्त जवान विजय मतकर यांचा भाजप शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.

भारतीय सैन्याने कारगिल युद्धात मिळवलेला विजय देशवासीयांच्या कायम स्मरणात राहावा यासाठी २६ जुलै हा दिवश विजय दिन म्हणून साजरा केला जातो. या युद्धात वीरमरण आलेल्या जवानांच्या आठवणी आणि तरूणांमध्ये देशाभिमान जागृत करण्याच्या उद्देशाने यंदाच्या वर्षी 26 जुलै रोजी राज्यातील सर्व चित्रपटांमध्ये “उरी द सर्जिकल स्ट्राइक” हा देशभक्तीपर हिंदी चित्रपट मोफत दाखवण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला होता. त्यानुसार पिंपरीतील अशोक टॉकिज, जयश्री चित्रपटगृह, विशाल ई-स्क्वेअर, आकुर्डीतील जय गणेश फेम आणि चिंचवडमधील बिग सिनेमा या पाच चित्रपटगृहांमध्ये शुक्रवारी सकाळी दहा वाजता “उरी द सर्जिकल स्ट्राइक” हा चित्रपट मोफत दाखवण्यात आला. हा देशभक्तीपर चित्रपट पाहण्यासाठी शहरातील तरुणांनी आणि माजी सैनिकांनी मोठी गर्दी केली होती. तरुणाईत देशभक्तीचा उत्साह पाहायला मिळाला.

  • चित्रपट सुरु होण्यापूर्वी चिंचवड येथील बिग सिनेमा चित्रपटगृहात कारगिल युद्धात सहभागी युद्धवीर निवृत्त जवान विजय मतकर यांचा आमदार लक्ष्मण जगताप यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी प्राधिकरणाचे अध्यक्ष सदाशिव खाडे, भाजप महिला आघाडी प्रदेश सचिव उमा खापरे, महिला आघाडीच्या शहराध्यक्षा शैला मोळक, शहर संघटन सरचिटणीस अमोल थोरात, युवा मोर्चा शहराध्यक्ष रवि लांडगे, नगरसेवक राजेंद्र गावडे, मोरेश्वर शेडगे, महेंद्र बाविस्कर, सारिका पवार, आशा काळे, रामकृष्ण राणे, प्रदीप बेंद्रे, अजय पाताडे आदी उपस्थित होते.

यावेळी आमदार लक्ष्मण जगताप म्हणाले, भारतात दहशतवाद पसरवणाऱ्या पाकिस्तानला आपल्या देशाच्या जवानांनी कारगिल युद्धात चोख प्रत्युत्तर दिले होते. या युद्धात भारतीय सैन्याने पाकिस्तानला धुळ चारून एक इतिहास रचला. या युद्धाचा शेवट 26जुलै 1999 रोजी झाला. आपण सर्व भारतीय हा दिवस विजय दिन म्हणून साजरा करतो.

  • कारगिल युद्धाच्या विजयाला 20 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त राज्यातील तरूणांमध्ये देशाभिमान जागृत करण्याच्या उद्देशाने त्यांना एक देशभक्तीपर चित्रपट मोफत दाखवण्याचा भाजप सरकारने निर्णय घेतला. “उरी द सर्जिकल स्ट्राइक” हा एक केवळ चित्रपट नसून आपल्या सैन्याचे सामर्थ्य दाखवणारा चित्रपट आहे. देशातील प्रत्येक नागरिकांमध्ये आपल्या जवानांच्या प्रती अभिमानाने ऊर भरून येईल, असा हा चित्रपट आहे. हा चित्रपट पाहिल्यानंतर आजच्या तरुणांनी आपल्या जवानांचे कष्ट आणि ते देशासाठी करत असलेली लढाई यांविषयी अभिमान बाळगावा, असे आवाहन जगताप यांनी केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.