Pimpri News : पुणे लॉक मात्र मसाप अनलॉक : उपमहापौर केशव घोळवे

एमपीसी न्यूज – महाराष्ट्र साहित्य परिषद पिंपरी चिंचवडने पुणे जिल्हा लॉकडाउन असताना खंड न पडता सातत्याने ऑनलाइन साहित्यिक उपक्रम घेऊन साहित्याची मशाल पेटती ठेवली. म्हणजेच पुणे लॉक मात्र, ‘मसाप’ अनलॉक. प्रत्येक मराठी माणसाने इंग्रजी शब्दांचा वापर न करता मराठीतच बोलावे, हीच कविवर्य कुसुमाग्रजांना खरी आदरांजली ठरेल, असे प्रतिपादन पिंपरी चिंचवडचे उपमहापौर केशव घोळवे यांनी केले.

महाराष्ट्र साहित्य परिषद पिंपरी चिंचवडच्या वतीने आयोजित ‘मराठी भाषा दिन’ या कार्यक्रमात घोळवे बोलत होते. यावेळी मसाप पिंपरी चिंचवडचे अध्यक्ष राजन लाखे, मसाप पुणेचे कार्यवाह शिरीष चिटणीस, माधव राजगुरु उपस्थित होते.

घोळवे म्हणाले, मराठी भाषा टिकविण्यासाठी तरुण पिढीला मराठी साहित्याची गोडी लावणे आवश्यक आहे. युवकांसाठी कार्यक्रम राबविले पाहिजेत. मराठीचा प्रचार आणि प्रसारासाठी कार्यरत असलेल्या मसापच्या मागणीनुसार मसापला उपक्रमासाठी व कार्यालयासाठी लवकरच जागा देण्याचे त्यांनी आश्वासन दिले.

_MPC_DIR_MPU_II

या कार्यक्रमात कविश्रेष्ठ कुसुमाग्रज यांच्या विविध कवितांचे आणि त्यांच्या नाटकातील परिच्छेदांचे मंगला पाटसकर, जयश्री श्रीखंडे, गोपी सांबारे, किशोर पाटील, कांचन नेवे, प्रतिभा कुलकर्णी, हर्षा शाह, संजीवनी पांडे, विनिता श्रीखंडे, रमाकांत श्रीखंडे, संभाजी बारणे, अरूण राव, उज्वला जगताप, विनोद गायकवाड, नरहरी वाघ, योगिता कोठेकर यांनी वाचन करुन मराठी कविश्रेष्ठ कुसुमाग्रज यांच्या साहित्याचा जागर केला.

यावेळी विविध कार्यक्षेत्रांत काम करणारे मसापचे सदस्य संजीवनी पांडे, रिबेका अमोलिकआणि महारुद्र शेठे यांचा भाषा दिनाचे औचित्य साधून उपमहापौरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

प्रास्ताविक राजन लाखे यांनी केले. सूत्रसंचालन संजय जगताप यांनी केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.