Pimpri: स्मार्ट सिटीवर पुण्याऐवजी आता पिंपरीचे पोलीस आयुक्त

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटी लिमिटेडच्या संचालक मंडळावर सरकारचे प्रतिनिधी म्हणून पुणे पोलीस आयुक्तांऐवजी आता पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तांची नियुक्ती करण्यात आली आहे. पोलीस आयुक्त आर. के. पद्मनाभन यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याबाबतचा आदेश राज्य सरकारच्या नगरविकास विभागाने काढला आहे.

नागरिकांचे जीवनमान उंचावण्यासाठी केंद्र सरकारने स्मार्ट सिटी प्रकल्प हाती घेतला आहे. देशातील 100 शहरांमध्ये हा प्रकल्प राबविण्यात येणार आहे. त्यामध्ये राज्यातील दहा शहरांचा समावेश करण्यात आला आहे. त्यात पुण्यासह पिंपरी – चिंचवड शहराचाही समावेश आहे. ही योजना राबविण्याकरिता पिंपरी महापालिकेकडून 13 जुलै 2017 रोजी पिंपरी – चिंचवड स्मार्ट सिटी लिमिटेड या विशेष उद्देश वहन कंपनीची स्थापना करण्यात आली आहे.

त्यावेळी पिंपरी – चिंचवड शहर पुणे पोलीस आयुक्तालयाच्या अखत्यारित असल्याने पिंपरी – चिंचवड स्मार्ट सिटी लिमिटेडच्या संचालक मंडळावर सरकारचे प्रतिनिधित्व करण्यासाठी पुणे पोलीस आयुक्तांची नियुक्ती करण्यात आली होती. राज्य मंत्रिमंडळाच्या 10 एप्रिल 2018 रोजी झालेल्या बैठकीत पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाला मान्यता देण्यात आली. 15 ऑगस्ट 2018 रोजी पुणे पोलीस आयुक्तालयातून विभाजन होऊन पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाचा स्वतंत्र कारभार सुरू झाला आहे.

त्यानुसार पिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटी लिमिटेडच्या संचालक मंडळावर सरकारचे प्रतिनिधी म्हणून पुणे पोलीस आयुक्तांऐवजी आता पिंपरी – चिंचवड पोलीस आयुक्तांची नियुक्ती करण्यात आली आहे. पिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटी लिमिटेडचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी हा बदल तातडीने करावा, असा आदेश नगरविकास विभागाने जारी केला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.