Pimpri: कर बुडवे, कर चुकव्यांकडून 100 टक्के करवसुली करणार -आयुक्त हर्डीकर

अर्थसंकल्पात कोणतीही कर वाढ नाही

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या यंदाच्या अर्थसंकल्पात कोणतीही करवाढ करण्यात आली नाही. कर बुडवे, कर चुकवेगिरी करणाऱ्याच्या मागे लागून 100 टक्के करवसूली करण्यावर भर दिला जाणार आहे. तसेच अधिकृत, अनधिकृत मालमत्ता शोधून त्यांची नोंदणी केली जाणार आहे. मालमत्ता करातून उत्पन्न वाढविण्यावर भर देण्यात येणार असल्याचे आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी सांगितले.

यावेळी हर्डीकर म्हणाले, उत्त्पन्नाचे स्त्रोत वाढवून अनावश्यक खर्च टाळण्यावर भर दिला जाईल. गेल्या वर्षीच पाणीपट्टीत वाढ केली होती. त्यामुळे यंदाच्या अर्थसंकल्पात पाणीपट्टीत कोणतीही वाढ केली नाही. मिळकतकर चुकवे, बुडवे यांच्याकडून 100 टक्के करवसूली करण्यावर भर दिला जाणार आहे. यंदाचा अर्थसंकल्प ‘कॅश फ्लो’ संकल्पनेवर आधारित आहे.

  • शहरातील अनेक अधिकृत, अनधिकृत मालमत्ताधारक आपल्या मालमत्तेची महापालिकेकडे नोंदणी करत नाहीत. कर बुडवेगिरी करत असल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आले आहे. बिगरनोंदीत मालमत्ता धारकांनी मालमत्तेची नोंदणी करावी. बिगरनोंदीच्या मालमत्ता शोधून त्यांची नोंदणी केली जाणार आहे. मालमत्ता करातून उत्पन्न मिळविण्यावर भर दिला जाणार असल्याचे आयुक्त हर्डीकर यांनी सांगितले.

उत्पन्नाचे स्त्रोत वाढविणार!
महापालिका आजपर्यंत पार्किंग शुल्क आकारत नव्हती. त्यामुळे पार्किंगच्या मोबदल्यात महापालिकेला उत्पन्न मिळत नव्हते. आता महासभेत पार्किंग पॉलिसी मंजूर केली आहे. त्यातून उत्पन्न मिळणार आहे. या उत्पन्नाचा सार्वजनिक वाहतूक किफायतशीर राहण्यासाठी उपयोग केला जाणार आहे. वैद्यकीय सुविधा वाढविण्यावर भर दिला जाणार आहे. त्याच्या माध्यमातून देखील उत्पन्न वाढविण्यावर भर देण्यात येईल.

  • भूमी – जिंदगी विभागातील आपल्या मालमत्ता, त्यांचा वापर, कालावधी अशी एकत्रित माहिती उपलब्ध नव्हती. त्याचे आता सुसूत्रीकरण करणार आहे. गाळे, इमारती, भाजी मंडई, इमारती याची माहिती एकत्रित करून ते भाडेतत्त्वावर देण्याची प्रक्रिया राबविली जाणार आहे. राज्य सरकारच्या धोरणानुसार गाळे आणि ओटे भाडेतत्त्वावर दिले जाऊन उत्पन्नवाढीवर जोर दिला जाणार आहे, असेही आयुक्त हर्डीकर यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.