Pimpri : प्रभाग स्तरावर होणार नियोजन; शिवसेना – भाजप नगरसेवकांची संयुक्त बैठक

एमपीसी न्यूज – लोकसभा निवडणुकीचे शिवसेना-भाजप-रिपइं-रासप-रयत क्रांती संघटना महायुतीकडून अत्यंत काटेकोरपणे होणार आहे. प्रभाग स्तरावर कार्यक्रम, कोपरा सभा आणि बैठकींचे नियोजन होणार आहे. खासदार बारणे आणि आमदार जगताप यांचे मनोमिलन झाल्यानंतर लगेच आमदार जगताप प्रचारात सक्रिय झाले आहेत. महायुतीबाबत नगरसेवकांच्या मनात कोणतीही शंका राहू नये, यासाठी दोन्ही पक्षांच्या नगरसेवक आणि पदाधिका-यांची बैठक घेण्यात आली.

बैठकीसाठी शिवसेना-भाजप-रिपइं-रासप-रयत क्रांती संघटना महायुतीचे उमेदवार, खासदार श्रीरंग बारणे, आमदार लक्ष्मण जगताप, आमदार अॅड. गौतम चाबुकस्वार, शिवसेना उपनेत्या उमा खापरे, जिल्हाप्रमुख गजानन चिंचवडे, शहरप्रमुख योगेश बाबर, सदाशिव खाडे, अमित गोरखे, नगरसेवक गोविंद घोळवे, सारंग कामतेकर, सीमा सावळे, प्रमोद कुटे, उर्मिला काळभोर, सीमा सावळे, नामदेव ढाके, मोरेश्वर शेडगे, प्रमोद निसळ, माऊली थोरात, अमोल थोरात, नंदू भोगले, शैला मोळक तसेच महायुतीचे सर्व नगरसेवक, नगरसेविका, पदाधिकारी उपस्थित होते.

  • महायुतीचा धर्म पाळून त्या दृष्टीने सर्व नागरिक, मित्र पक्षांना सोबत घेऊन काम करावं. सगळ्यांनी एकत्र यावं. प्रथम देश, नंतर पक्ष आणि शेवटी स्वतः या तत्वाने काम करावं. विजयाचा आत्मविश्वास बाळगून त्याबाबत चर्चा करावी. सकारात्मक चर्चा केल्यास जिंकणं आणखी सोपं होईल. जोमाने काम केलं तर अपेक्षित मताधिक्य मिळेल. त्यासाठी नियोजन असायला हवं. प्रत्येक प्रभागात किमान चार बैठका व्हायला हव्यात. लक्ष्मण जगताप आणि श्रीरंग बारणे हा भाग सोडून देशात नरेंद्र मोदी यांचे सरकार येण्यासाठी काम करण्याचे बैठकीत ठरले.

नुकत्याच झालेल्या खासदार बारणे आणि आमदार जगताप यांच्या मनोमिलनाने आजवरच्या बारणे – जगताप चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे. भाजप हा शिस्तीचा पक्ष असल्याने लोकसभा निवडणुकीत शिस्तीने नियोजन होणार आहे. प्रभाग स्तरावर नियोजन होत असल्याने कामात उरक येईल, असा विश्वास बैठकीत व्यक्त करण्यात आला. विरोधकांकडून सर्वसामान्य नागरिकांना वेगवेगळी प्रलोभने दाखवली जातील. या प्रलोभनांना बळी न पडण्यासाठी नगरसेवकांनी दक्ष राहायला हवे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांनी राज्यातील प्रत्येक मतदारसंघावर बारीक लक्ष ठेवले आहे. त्यामुळे महायुतीचा विजय होणार आहे. हा विजय मिळवण्यासाठी एकत्रित काम करायला हवं.

  • प्रभागातील चारही नगरसेवक प्रचाराचे एकत्रित नियोजन करणार आहेत. खराळवाडी सारख्या ज्या प्रभागात महायुतीचे नगरसेवक नसतील त्या ठिकाणी प्रमुख स्थानिक कार्यकर्त्यांना जबाबदारी देण्यात येणार आहे. मावळ लोकसभा मतदारसंघात पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सभा होणार आहेत.

खासदार बारणे यांचा उमेदवारी अर्ज मंगळवारी (दि. 9) भरण्यात येणार आहे. त्यासाठी शिवसेना-भाजप-रिपाइं-रासप-रयत क्रांती संघटना महायुतीच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी व नागरिकांनी मोठ्या संख्येने खंडोबा माळ चौक आकुर्डी येथे एकत्र येण्याचे आवाहन बैठकीत करण्यात आले.

  • शिवसेना-भाजप-रिपाइं-रासप-रयत क्रांती संघटना महायुतीचे मध्यवर्ती कार्यालय आंबेडकर चौक येथे सुरू करण्यात आले आहे. या मध्यवर्ती कार्यालयाचे उदघाटन उमेदवारी अर्ज भरल्यानंतर दुपारी दोनच्या सुमारास करण्यात येणार आहे.

सूत्रसंचालन अमोल थोरात यांनी केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.