Pimpri: मुख्यमंत्र्यांनी शहरातील लोकप्रतिनिधींचे प्रगतीपुस्तक तपासावे; घर बचाव संघर्ष

एमपीसी न्यूज – लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागल्याने भाजपच्या प्रचाराचा प्रारंभ करण्यासाठी मुख्यमंत्री देंवेद्र फडणवीस आज (शनिवारी) शहरात येणार आहेत. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्राधिकरण येथे मुख्यमंत्र्यांची सभा आहे. लोकप्रतिनिधी सभेच्या तयारीत व्यग्र आहेत, परंतु रोज वेगवेगळ्या समस्यांशी झुंजणा-या या शहरासाठी लोकप्रतिनिधींनी काय केले ? याचे प्रगतीपुस्तक एकदा मुख्यमंत्र्यांनी तपासावे आणि मग सभेला संबोधित करावे, अशी मागणी घर बचाव संघर्ष समितीच्या वतीने करण्यात आली आहे.

समितीच्या वतीने याबाबत प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, शहरातील मोठा कामगार, कष्टकरी, मध्यमवर्गीय समुदाय कित्येक समस्यांमुळे हैराण झालेला आहे. अनधिकृत घरांचा तसेच शास्तीकर प्रश्‍न, एचसीएमटीआर रिंग रोड प्रश्न, पाणीटंचाई, कचरा समस्या तसेच नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न, पालिकेतील वाढता भ्रष्टाचार यामुळे पिंपरी चिंचवडकर प्राथमिक व्यवस्थेशीच झगडत आहेत.

अनधिकृत घरे तसेच एचसीएमटीआर 30 मीटर रिंग रेल रोड प्रकल्प प्रश्नामुळे शहरातील सात लाखापेक्षा जास्त जनसंख्या बाधित होत आहे. यामुळे अनधिकृत घरे नियमितीकरण प्रक्रिया तात्काळ सुरू होणे आवश्‍यक आहे. शहरातील लोकप्रतिनिधी यांनी हे प्रश्न गांभीर्याने सोडविला नसल्याने नागरिकांचे आता मुखमंत्र्याच्या निर्णयाकडे लक्ष लागले आहे. नगरविकास खात्याचे प्रमुख मुख्यमंत्रीच असल्याने घरे नियमितीकरणासाठी त्यांनी योग्य असा तोडगा काढावा व या प्रश्नाचे निराकरण करावे अशी नागरिकांची अपेक्षा आहे. या सभेपूर्वी लोकप्रतिनिधींनी शहरातील समस्या निराकरणासाठी काय काय योगदान दिले याबाबत सर्वांचे प्रगतीपुस्तक तपासावे असे आवाहनच समितीने केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.