Pimpri : मुंबईतील शिवस्मारकाचा अहवाल सादर करा, पंतप्रधान कार्यालयाचा आदेश

सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर यांनी केली होती तक्रार

एमपीसी न्यूज – मुंबईतील अरबी समुद्रात उभारण्यात येणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचा सविस्तर अहवाल सादर करण्यात यावा असा आदेश पंतप्रधान कार्यालयाने राज्य सरकारला दिला आहे. सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर यांनी यातील गैरव्यवहाराची चौकशी ईडी मार्फत करावी अशी मागणी थेट पंतप्रधानांकडे केली होती. या तक्रारीला उत्तर देताना पंतप्रधानांनी या प्रकरणाला गांभीर्याने घेत, हा अहवाल राज्य सरकारकडून मागवला आहे, अशी माहिती मारुती भापकर यांनी दिली आहे.

29 नोव्हेंबर 2019 ला तसे आदेश पंतप्रधान कार्यालयातून देण्यात आले आहेत, असे मारुती भापकर यांनी सांगितले. राज्य सरकारकडून उभारण्यात येणाऱ्या शिवस्मरकाची उंची 121.2 मीटर कायम ठेवत, संरचनेत मात्र बदल करण्यात आला आहे. या आधी 3826 कोटी रुपयांच्या निविदेत 83.2 मीटर उंचीचा पुतळा तर 38 मीटर लांबीची तलवार असं 121.2 मीटरचे स्मारक उभारले जाणार होते, परंतु एल ऍण्ड टी कंपनीसोबत वाटाघाटी करत 121.2 मीटर उंची कायम ठेवत, पुतळ्याची 75.7 मीटर तर तलवारीची लांबी 45.5 मीटर करण्यात आली आहे. यासाठी निविदेची रक्कम ही 2500 कोटींवर आणली असल्याचे भापकरांनी तक्रारीत म्हटलंय. तसेच क्षेत्रात ही बदल केल्याचं नमूद केलंय. निविदा प्रक्रिया आणि कंत्राटातील याच गैरव्यवहाराची ईडी मार्फत चौकशी करण्याची मागणी भापकर यांनी केली होती.

त्यांच्या तक्रारीची दखल पंतप्रधान कार्यालयाने घेतली आहे. अरबी समुद्रात उभारण्यात येणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचा सविस्तर अहवाल मागविला आहे, अशी माहिती भापकर यांनी दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
You might also like