Pimpri: ‘पीएमपी’ 3 सप्टेंबरपासून धावणार, संचालक मंडळाच्या बैठकीत निर्णय

सार्वजनिक वाहतूक असलेली पीएमपीएल बस सुरु होणार असल्याने पुणे, पिंपरी-चिंचवडमधील प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.

एमपीसी न्यूज – कोरोनाच्या लॉकडाउनमुळे मागील पाच महिन्यांपासून बंद असलेली पुणे महानगर परिवहन महामंडळाची (पीएमपीएमल) बससेवा पुन्हा सुरु होणार आहे. 3 सप्टेंबर 2020 पासून 25 टक्के पीएमपीएल बस रस्त्यावर धावणार आहेत.

याबाबतचा निर्णय आज (गुरुवारी) झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. सार्वजनिक वाहतूक असलेली पीएमपीएल बस सुरु होणार असल्याने पुणे, पिंपरी-चिंचवडमधील प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.

पुणे पालिकेतील महापौरांच्या दालनात संचालक मंडळाच्या झालेल्या बैठकीला पिंपरी-चिंचवडच्या महापौर तथा संचालिक उषा ढोरे, पुण्याचे महापौर तथा संचालक मुरलीधर मोहोळ, पिंपरीचे आयुक्त श्रावण हर्डीकर, पुणे पालिकेचे आयुक्त विक्रम कुमार, पीएमपीएमलचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक राजेंद्र जगताप, पिंपरीचे स्थायी समिती अध्यक्ष तथा संचालक संतोष लोंढे, पुण्याचे स्थायी समिती अध्यक्ष तथा संचालक हेमंत रासने, आणि पीएमपीएमलचे संचालक शंकर पवार उपस्थित होते.

कोरोना विषाणूचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी पुणे व पिंपरी-चिंचवड शहरातील पीएमपीएमएल परिवहन सेवा देशामध्ये संचारबंदी लागू झाल्यापासून बंद करण्यात आलेली होती.

पुणे व पिंपरी-चिंचवड पालिका कार्यक्षेत्रामधील लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, विद्यार्थी, कामगार तसेच नागरीकांकडून दैनंदिन पीएमपीएमएल बससेवा सुरु करण्याची ब-याच दिवसांपासून वारंवार मागणी करण्यात येत होती.

कोरोना विषाणू संसर्गाचा धोका लक्षात घेऊन सर्व शासकीय सुचना, नियमांचे पालन करत सुरक्षित अंतर पाळून गणेश विसर्जनाची गर्दी लक्षात घेता 3 सप्टेंबर 2020 पासून 25 टक्के पीएमपीएमएल बस सेवा सुरु करण्यात येणार आहे.

बस आसन क्षमतेच्या 50 टक्के प्रवाशांना सेवा उपलब्ध करुन देण्यात येणार असल्याचे सांगितले.

महापौर उषा ढोरे यांनी कोरोना संसर्गा पासून बचाव करण्यासाठी नागरीकांनी सर्व शासकीय सुचना नियमांचे पालन करत मास्क व सॅनिटायझरच्या वापरासोबतच सुरक्षित अंतराचे पालन करुन प्रवास करावा असे आवाहन यावेळी केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.