Pimpri : 3 बीआरटी मार्ग तयार ; बस नसल्याने मार्ग सुरु करण्यास पीएमपीएलची असमर्थतता

एमपीसी न्यूज – नागरिकांना विनाअडथळा जलद प्रवास करता यावा यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने विकसित करण्यात आलेल्या काळेवाडी फाटा ते देहू आळंदी चिखली रस्ता, देहू ते आळंदी आणि आळंदी ते बोपखेल या नवीन बीआरटी मार्गावर धावण्यासाठी पुणे महानगर परिवहन महामंडळाकडे (पीएमपीएल)बस उपलब्ध नाहीत. पीएमपीएलच्या ताफ्यातील 990 बसपैकी बीआरटी संचलनासाठी केवळ 425 बस उपलब्ध होत आहेत. त्यामुळे नवीन बीआरटी मार्गावर बस सोडण्यास महामंडळ असमर्थ असल्याचे, पीएमपीएमएलच्या महाव्यवस्थापकांनी महापालिकेला कळविले आहे. त्यामुळे नवीन बीआरटी मार्ग सुरु होण्यास विलंब होणार आहे.

नागरिकांना विनाअडथळा जलद प्रवास करता यावा, प्रदूषणमुक्तीसाठी सार्वजनिक वाहतुकीचा जास्तीत जास्त उपयोग व्हावा, यासाठी ‘बस रॅपिड ट्रान्झीट सिस्टम’  अर्थात बीआरटीएस मार्ग उभारण्यात आले आहेत. तसेच विविध मार्गावर बीआरटी मार्गीकांची उभारणी करण्यात येत आहे. पिंपरी-चिंचवडमध्ये सांगवी फाटा ते मुकाई चौक किवळे, नाशिकफाटा ते वाकड आणि दापोडी ते निगडी हे तीन बीआरटीएस मार्ग सुरु आहेत. या तिन्ही मार्गावरुन एकूण 586 बस धावतात. महामंडळाच्या बस ताफ्यामध्ये बीआरटी संचलनाकरिता महामंडळाच्या 337 बीआरटी बसेस व भाडेतत्वावरील 653 बीआरटी बस अशा एकूण 990 बस मार्गावर संचलानकरिता उपलब्ध आहेत.

पिंपरी महापालिकेने काळेवाडी फाटा ते देहू आळंदी रस्ता चिखली, देहू ते आळंदी आणि  आळंदी ते बोपखेल या मार्गावर बीआरटी विकसित केली आहे. या मार्गावर बस सेवा सुरु करण्याबाबत महापालिकेने पीएमपीएमएल प्रशासनाकडे पत्रव्यवहार केला होता. परंतु, पीएमपीएमएलकडे बीआरटी बसेस कमी आहेत. सध्याच्या 990 बसेसपैकी बीआरटी संचलनासाठी केवळ 425 बस उपलब्ध होत आहेत. त्यामुळे बीआरटी संचलानासाठी महामंडळाला आणखीन बसेसची आवश्यकता आहे. त्यानंतरच नवीन सुरु होणा-या मार्गीकांवर बस संचलन करणे महामंडळास शक्य होणार आहे. सद्य:स्थितीत महामंडळ नवीन बीआरटी बस मार्गावर संचलन करण्यास असमर्थ असल्याचे, महामंडळाने महापालिकेला कळविले आहे. त्यामुळे नवीन बीआरटी मार्गावर धावण्यास विलंब होणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.