BNR-HDR-TOP-Mobile

Pimpri : सराफी पेढ्यांच्या सुरक्षेबाबत व्यावसायिकांना पोलिसांकडून मार्गदर्शन

सराफी पेढ्यातील चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी गुन्हे शाखेची सराफी व्यावसायिकांसोबत बैठक

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरात सराफी पेढ्या फोडण्याच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत. त्या पार्श्वभूमीवर गुन्हे शाखा युनिट एकच्या पोलिसांनी सराफी व्यावसायिकांची बैठक घेतली. यामध्ये व्यावसायिकांना दुकान आणि दागिन्यांची काळजी घेण्याबाबत मार्गदर्शन केले.

बैठकीसाठी सहाय्यक पोलीस आयुक्त सतीश पाटील, गुन्हे शाखा युनिट एकचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक उत्तम तांगडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश पाटील आणि शहरातील 25 सराफी व्यावसायिक उपस्थित होते.

पिंपरी-चिंचवड शहरात पिंपरी आणि निगडी येथे एकाच रात्री सराफी पेढ्यांमध्ये चोरी झाली. एका दुकानातून तब्बल 50 किलो चांदी आणि 17 तोळे सोने तर दुस-या दुकानातून दीड किलो चांदीचे दागिने चोरट्यांनी चोरून नेले. एका दुकानाच्या शटरला सेंट्रल लॉक असताना देखील ते उचकटून चोरी करण्यात आली आहे. त्यामुळे सराफी व्यावसायिकांना दुकानाच्या सुरक्षेची काटेकोरपणे काळजी घ्यावी लागणार आहे. त्याबाबत गुन्हे शाखा युनिट एक येथे सराफी व्यावसायिकांची बैठक घेण्यात आली. व्यावसायिकांना वेगवेगळ्या सूचना करत गुन्हेगार चोरी करताना वापरत असलेल्या हत्यारांची देखील माहिती देण्यात आली.

सराफी व्यावसायिकांना पोलिसांनी केलेल्या सूचना –

# चांगल्या प्रतीचे सीसीटीव्ही कॅमेरे लावावेत
# कॅमे-यांची दिशा आणि जागा उचित ठिकाणी असावी
# दुकानात सायरन बसवावेत
# दुकानात सुरक्षा रक्षक असावा
# दुकानाच्या भिंती मजबूत कराव्यात
# दुकानाच्या शटरचा पत्रा चांगल्या प्रतीचा असावा
# त्यावर सेफ्टी डोअर बसवावे
# शटर पूर्णपणे लॉक करण्याची काळजी घ्यावी
# दुकानातील कामगारांची संपूर्ण माहिती संबंधित पोलीस ठाण्यात द्यावी
# दुकानासमोर संशयित इसम आढळल्यास तात्काळ पोलिसांशी संपर्क करावा
# दुकान बंद करताना दागिने सुरक्षित ठेवावेत

Advertisement

HB_POST_END_FTR-A3