Pimpri: मुख्यालयाच्या इमारतीसाठी पोलीस आयुक्तालयाला पाच वर्षासाठी मोजावे लागणार अडीच कोटी

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरासाठी नव्याने सुरु झालेल्या पोलीस आयुक्तालयाच्या मुख्यालयासाठी पालिकेच्या चिंचवड, प्रेमलोक पार्क येथील महात्मा फुले शाळेची इमारत देण्यात आली. या इमारतीच्या भाड्यापोटी पोलिसांना पाच वर्षाकरिता दोन कोटी 34 लाख 67 हजार 700 रुपये पालिकेला द्यावे लागणार आहेत. हा दर पालिकेने पोलिसांना कळविला आहे.

महात्मा फुले शाळेच्या इमारतीमध्ये फर्निचरसह स्थापत्य विषयक कामे सुरु आहेत. त्यामुळे स्वातंत्र्य दिनापासून पिंपरी-चिंचवडसाठी पोलीस आयुक्तालय तात्पुरत्या स्वरुपात चिंचवड येथील ऑटो क्लस्टर मधून सुरु झाले आहे. पिंपरी – चिंचवड पोलीस आयुक्तालयाला मंत्रीमंडळाच्या 10 एप्रिल 2018 रोजी झालेल्या बैठकीत मान्यता देण्यात आली होती. पोलीस आयुक्तालयाला मंजुरी मिळाल्यानंतर पोलिसांनी प्रशस्त जागा शोधण्यास सुरुवात केली. त्यानुसार, चिंचवड – प्रेमलोक पार्क येथील महापालिकेच्या महात्मा फुले शाळेची इमारत पोलीस आयुक्तालयास योग्य असून ती इमारत भाड्याने देण्यात यावी, असे पत्र पोलिसांनी 8 मे 2018 रोजी महापालिकेला दिले होते. त्यानुसार, या शाळेची इमारत पोलीस आयुक्तालयासाठी भाड्याने देण्यास महापालिका सभेनेही मान्यता दिली.

पोलीस आयुक्तालयाची कामे महापालिकेच्या तीन इमारतीत करण्यात येणार आहेत. चिंचवड – प्रेमलोक पार्क येथील महापालिकेच्या महात्मा फुले शाळेच्या इमारतीत आयुक्तालयाचे काम होणार असून निगडीतील कै. अंकुशराव बो-हाडे विद्यालय आणि चिंचवड आरक्षण क्रमांक 211 मधील व्यापारी केंद्रातही इतर विभागांची कामे होणार आहेत.

चिंचवड, प्रेमलोक येथील महात्मा फुले शाळेची इमारत प्रशस्त आहे. ग्राऊंड फ्लोअर, दोन मजले, भुखंडाचे क्षेत्रफळ एकूण 4427.50 चौरस मीटर आहे. तळमजला 761.84 चौरस मीटर आहे. पहिला मजला 731.29 तर दुसरा मजला 712.00 चौरस मीटर आहे. शाळेसमोरील मोकळ्या मैदानाचे क्षेत्रफळ 3665.16 चौरस मीटर आहे. प्रत्येक मजल्यावर सात वर्ग खोल्या आणि एक सभागृह आहे. या इमारतीसाठी पालिकेने पाच वर्षाकरिता दोन कोटी 34 लाख 67 हजार 700 रुपये भाडे आकारण्याचे निश्चित केले आहे. या दराचा प्रस्ताव पोलिसांना कळविण्यात आला आहे.

भूमी व जिंदगी विभागाचे सहायक आयुक्त मंगेश चितळे म्हणाले, “‘पोलीस आयुक्तालयासाठी चिंचवड – प्रेमलोक पार्क येथील महापालिकेच्या महात्मा फुले शाळेची इमारत, निगडीतील कै. अंकुशराव बो-हाडे विद्यालय आणि चिंचवड आरक्षण क्रमांक 211 मधील व्यापारी केंद्राची जागा देण्यात येणार आहे. यापैकी महात्मा फुलेच्या शाळेचे भाडे निश्चित करण्यात आले असून या इमारतीचे भाडे पाच वर्षाकरिता दोन कोटी 34 लाख 67 हजार 700 रुपये आकारण्यात येणार असून हा दर पोलिसांना देण्यात आला आहे”

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.