Pimpri : खंडणीचा गुन्हा दाखल झालेले दोन पोलीस कर्मचारी निलंबित

एमपीसी न्यूज – मोबाईल टॉवरच्या बॅटरी चोरण्याच्या संशयावरुन एका तरुणाला ताब्यात घेऊन बेदम मारहाण करणे, शॉक देऊन त्याच्याकडून आठ लाख रुपये उकळल्या प्रकरणी खंडणीचा गुन्हा दाखल झालेल्या कॉन्स्टेबलसह दोघांना निलंबित करण्यात आले आहे. पोलीस आयुक्त आर. के. पद्मनाभन यांनी ही कारवाई केली आहे.

रमेश नाळे आणि हेड कॉन्स्टेबल राजू केदारी असे निलंबित केलेल्या गुन्हे शाखा युनिट एकचे पोलीस कर्मचाऱ्यांची नावे आहेत. त्यांच्यावर आज पिंपरी पोलीस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल झाला असून त्यांना लवकरच अटक केली जाईल, असेही आयुक्त पद्मनाभन यांनी सांगितले.

पोलीस कॉन्स्टेबल रमेश नाळे, केदारी आणि त्यांच्या सहकाऱ्यांना मोबाईल टॉवरच्या बॅटरी चोरणाऱ्यांची माहिती मिळाली होती. त्यानुसार त्यांनी सापळा रचून एका तरुणाला ताब्यात घेतले. तरुणाकडे चौकशी करुन बेदम मारहाण केली. तसेच त्याला विजेचा शॉक देखील दिला होता.

चौकशीमध्ये ताब्यात घेण्यात आलेल्या तरुणाकडे काहीच मुद्देमाल सापडला नाही. त्यामुळे नाळे यांनी तरुणाला ग्रामीण पोलिसांच्या स्वाधीन करुन आठ लाख रुपये घेतले. तसेच नाळे यांनी केलेल्या कारवाईची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिली नव्हती. याबाबतची माहिती मिळाल्यानंतर
पोलीस आयुक्तांनी रमेश नाळे, केदारी आणि कारवाई दरम्यान असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार नाळे आणि केदारी यांच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.