BNR-HDR-TOP-Mobile

Pimpri : कुटुंब व कर्तव्य यांचा तोल सांभाळणारी जिगरबाज महिला पोलीस उपायुक्त नम्रता पाटील

(गणेश यादव )

एमपीसी न्यूज – आम्ही आपल्यासमोर एका अशा महिलेची गाथा उलगडत आहोत; ज्या महिलेने एक आदर्श मुलगी, बहीण, पत्नी, आई यांसह एक उत्तम पोलीस अधिकारी पदाची जबाबदारी अत्यंत भारदस्तपणे पेलली आहे. त्यांचा प्रवास भारतीय रेल्वे खात्यातील लिपिक पदापासून सेबी आणि महाराष्ट्र पोलीस दलाच्या मार्गाने आता पोलीस उपायुक्त पदापर्यंत येऊन पोहोचला आहे.

15 ऑगस्ट 2018 पासून नव्याने सुरू झालेल्या पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातील पोलीस उपायुक्त नम्रता पाटील या मूळच्या मुंबईच्या. दोघी बहिणी आई वडील, असा लहान आणि सुखी परिवार होता. वडील गिरणी कामगार होते. नम्रता पाटील नववीत असताना वडिलांचं छत्र हरवलं. पण आईने त्याची जाणीव कधीच होऊ दिली नाही. नोकरी करून दोन्ही मुलींना आईने शिकवलं. नम्रता यांना लहानपणापासून वाचनाची प्रचंड आवड होती. मिळेल ते पुस्तक वाचायचं, चर्चा, वादविवाद हे त्यांच्या आवडीचे विषय होते. बारावी झाल्यानंतर त्यांनी 1997 साली भारतीय रेल्वे खात्यात लिपिक पदाची परीक्षा दिली. त्यात त्यांना यश मिळाले. आर्थिक आधार मिळाल्याने सगळे आनंदित होते. एवढ्यावर थांबता येणार नाही. आणखी मोठ्या आकाशाला गवसणी घालायची आहे, असं मनात स्वप्न बाळगून त्यांनी पुढचे शिक्षण सुरू ठेवले. एम कॉम, आय डब्ल्यू सी पर्यंत शिक्षण झालं. त्यानंतर त्यांनी भारत सरकारचे गैरवैधानिक मंडळ ‘सेबी’ मध्ये व्यवस्थापक म्हणून सुमारे सव्वा वर्ष नोकरी केली. याच दरम्यान त्यांचा विवाह झाला.

दरम्यान त्यांच्या एका मैत्रिणीला स्पर्धा परीक्षेत यश मिळालं होतं. ते पाहून त्या स्पर्धा परीक्षेकडे आकर्षिल्या. त्यांनी वर्षभर केंद्रीय लोकसेवा आयोगाची तयारी केली. पहिल्या प्रयत्नात यश मिळालं नाही. म्हणून त्यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा दिली. 2002 साली झालेल्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत त्या महाराष्ट्रातून प्रथम आल्या. जिद्द, चिकाटी, मेहनत आणि आत्मविश्वास ही चतुःसूत्री घेऊन त्यांनी महाराष्ट्र पोलीस दलात प्रवेश केला. एवढे मोठे यश त्यांनी कोणत्याही स्पर्धा परीक्षेच्या क्लास शिवाय केवळ स्वयं अध्ययनाच्या जोरावर मिळविले. ठरवून आणि पाठ केलेल्या उत्तरांपेक्षा स्वतःची आणि व्यावहारिक उत्तरे देणं ही त्यांच्या अभ्यासाची पद्धत आहे.

नाशिक येथे प्रशिक्षण घेतल्यानंतर नाशिक येथेच त्यांचा प्रोबेशनचा कालावधी गेला. त्यानंतर 2007 साली त्यांना पोलीस उपअधीक्षक म्हणून रत्नागिरी मधील खेड येथे नियुक्ती मिळाली. 2010 साली रायगड जिल्ह्यातील खालापूर येथे बदली झाली. यानंतर 2012 साली त्यांची बुलढाणा येथे बदली होऊन अप्पर पोलीस अधीक्षक म्हणून बढती मिळाली. वर्षभराच्या कालावधीत त्यांची पुन्हा एनआयए, मुंबई येथे बदली झाली. इथे असताना त्यांनी आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटनांच्या कारवायांचा तपास केला. तसेच चर्चेतील काही खुनांच्या गुन्ह्यांचे तपास केले. 2017 मध्ये काही काळ पोलीस महासंचालक कार्यालयात सेवा केल्यानंतर त्यांची बदली पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयात पोलीस उपायुक्त पदावर झाली.

पोलीस दलाची नोकरी आणि कौटुंबिक आयुष्याबाबत बोलताना नम्रता पाटील म्हणतात, “पोलीस दलात वेळेची अनियमितता असते. त्यामुळे वेळेवर घरातून निघून वेळेत घरी पोहोचायचे हे सूत्र इथे कामी येत नाही. कामाचं पूर्व नियोजन करता येत नाही. तरीही त्यातून वेळ काढून कुटुंबाला वेळ द्यावा लागतो. सकाळी एक तास मुलींना द्यायचा. त्यात त्यांच्या शाळेची तयारी, त्यांच्याशी गप्पागोष्टी, केलेल्या अभ्यासाची उजळणी अशी अनेक कामं करून घ्यायची. मुली रात्री झोपण्यापूर्वी घरी जाणं झालं तर त्यांचा अभ्यास घ्यायचा. त्यांना अभ्यास करायला मार्गदर्शन करायचं. अशी दररोज तारेवरची कसरत करावीच लागते”

मुलींबाबतचे आठवणीतले प्रसंग सांगताना त्या म्हणतात, “एकदा एक दरोडा पडला. रात्रीच त्याची माहिती मिळाली. जाणं गरजेचं होतं. त्या दिवशी रात्री मुलगी आणि मी दोघीच होतो. एकट्या लहान मुलीला सोडून जाणं योग्य नाही म्हणून शेजा-यांचा दरवाजा वाजवला. त्यांच्याकडे मुलीला झोपवलं. रात्रभर काम चाललं, पाच वाजता काम संपवून परत आले. मुलगी शेजा-यांच्या घरात गाढ झोपलेली होती. तिला अलगद उचलून घरी आणली आणि पुन्हा झोपवली. कधीकधी मुलींना ड्रायवर, स्वयंपाकीण यांच्या सोबत सुद्धा सोडून कामासाठी बाहेर जावं लागलं आहे. आता एक मुलगी 12 वर्षांची झाली आहे. इतर दोन मुली लहान आहेत. पण मोठी मुलगी लहान बहिणींना सांभाळून घेते. त्यामुळं आता जरा आराम मिळत आहे”

त्या पुढे म्हणतात, “घरातून मिळणारा सपोर्ट कामातील उर्मी वाढवतो. त्यामुळं कामं चांगल्या पद्धतीने होतात. धावणे हा माझा विरंगुळा आहे. धावत असताना अनेक नवीन कल्पना येतात. मन प्रसन्न आणि शरीर निरोगी राहते. त्यासाठी मी मॅरेथॉनमध्ये सहभाग घेते. 42 किलोमीटरचे अंतर धावत असताना अनेकदा दम लागतो, पळावसं वाटत नाही, पायाला गोळे येतात, शरीर थरथरायला लागतं, भूक लागते, तहान लागते पण तरीही धावत राहायचं. हा जगण्याचा नियम आहे. यातून जीवनातल्या कटू प्रसंगांवर मात करण्याची प्रेरणा मिळते. मॅरेथॉन सुरू करताना मी एकच विचार करते ‘आपण स्टार्ट लाईनवर उभे आहोत, ते फिनिश करण्यासाठीच’. त्यामुळं काहीही झालं तरी कितीही संकटे आली तरी ती धुडकावून मजेत जगता आलं पाहिजे”

HB_POST_END_FTR-A2

.