Pimpri : मंडईतील दुकाने सुरू ठेऊन गर्दी केल्याबाबत तीन दुकानदारांना पोलिसांकडून नोटीस

एमपीसी न्यूज –  कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवड शहरात संचारबंदी आणि जमावबंदीचे आदेश देण्यात आले आहेत. या आदेशाचे उल्लंघन करून पिंपरी येथील लाल बहादूर शास्त्री भाजी मंडईत काही दुकानदारांनी त्यांचे दुकाने सुरू ठेवून नागरिकांची गर्दी जमवली. यामुळे कोरोना विषाणूचा संसर्ग वाढण्याची शक्यता निर्माण झाली. याबाबत पिंपरी पोलिसांनी तीन दुकानदारांना नोटीस बजावली आहे.

सुनील हिरामण कुदळे (वय 32), महेश बाळासाहेब घरद (वय 32, दोघे रा. पिंपरी गाव), ज्ञानेश्वर तुकाराम तापकीर (वय 36, रा. वडमुखवाडी, च-होली) यांना नोटीस बजावण्यात आली आहे. तसेच त्यांच्यावर भारतीय दंड विधान कलम 188, 269, 270, 290 तसेच महाराष्ट्र कोव्हिड उपाययोजना 2020 चे कलम 11, आपत्ती व्यवस्थापन कायदा कलम 51 ब, साथरोग प्रतिबंधक कायदा कलम 3 अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक रमेश केंगार यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोरोना विषाणूचा संसर्ग शहरात गतीने पसरत आहे. त्यामुळे पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत कोणत्याही रस्त्यावर, सार्वजनिक ठिकाणी संचारबंदी आणि जमावबंदी करण्यात आली आहे. याबाबतचा आदेश दिलेले असताना आरोपींनी आपल्या दुकानासमोर भाजीमंडीतील खरेदीदार व  व्यापारी यांचा जमाव जमवून स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी भाजीची विक्री केली.

एका ठिकाणी गर्दी झाल्याने कोरोना विषाणूचा संसर्ग पसरण्याचा धोका निर्माण झाला. याबाबत पोलिसांना माहिती मिळाली असता पोलिसांनी सौम्य लाठीमार करून गर्दी पांगवली. त्यानंतर पोलिसांनी तीन दुकानदारांना नोटीस देत त्यांच्यावर गुन्हा नोंदवला आहे. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.