Pimpri : पिंपरी पोलिसांची कामगिरी; 14 आरोपींकडून 14 लाखांचा ऐवज जप्त

एमपीसी न्यूज – पिंपरी पोलिसांनी विविध गुन्ह्यातील 14 आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत. त्यांच्याकडून सोन्याचे दागिने, रोख रक्कम, मोटार सायकली, कार, मोबाईल फोन, घड्याळ, गावठी कट्टा आणि देशी बनावटीचे पिस्टल असा एकूण 14 लाख रुपयांचा ऐवज जप्त केला आहे. यामुळे जबरी चोरीचे पाच, सोनसाखळी चोरीचा एक, घरफोडीचे पाच, वाहन चोरीचे पाच, आर्म अॅक्टचे दोन असे एकूण 18 गुन्हे उघडकीस आले आहेत.

रमाबाई नगर, पिंपरी येथे मंगळवारी (दि. 4) ज्युपिटर गाडी आणि पावणे दोन लाखांची रोकड पळवल्याची घटना घडली. याबाबत पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पिंपरी पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपींचा शोध घेऊन चोवीस तासाच्या आत आयुब नजीर शेख (वय 23, रा. शीतलानगर, देहूरोड) आणि मस्तान अहमद कुरेशी (वय 23, रा. राजीव गांधी नगर, देहूरोड) या दोघांना आकुर्डीमधील खंडोबा माळ चौकातून ताब्यात घेतले. त्यांच्याकडे कसून चौकशी केली असता, त्यांनी रोकड चोरीचा गुन्हा दहा जणांनी मिळून केला असल्याची कबूली दिली.

त्यावरून सलमान मेहबूब शेख (वय 22), रफिक अब्दुल शेख (वय 19), सिद्दीक आताकुररहमान शेख (वय 23, तिघे रा. आंबेडकर नगर, देहूरोड), नियाज जमीर शेख (वय 21, रा. थॉमस कॉलनी, देहूरोड) आणि नवशाज नजीर शेख (वय 20, रा. राजीव गांधी नगर झोपडपट्टी, देहूरोड) या पाच जणांना ताब्यात घेतले. तसेच या गुन्ह्यातील अल्ताफ बबलू रंगरेज (रा. आंबेडकर नगर, देहूरोड), साबीर समीर शेख (वय 19, रा. देहूरोड), लाला उर्फ अताहुल्ला सिकंदर शेख (देहूरोड) हे तीन आरोपी अद्याप फरार आहेत. ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपींकडे कसून चौकशी करत सात जणांकडून 40 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने, 7 हजार 200 रुपये रोख, 3 मोटारसायकल, 4 मोबाईल फोन, 1 कार असा एकूण 5 लाख 67 हजार रुपयांचा ऐवज हस्तगत करण्यात आला. यामुळे पिंपरी पोलीस ठाण्यातील 5 गुन्हे उघड झाले आहेत.

पिंपरी पोलिसांनी 22 ऑगस्ट रोजी अजय सतीश दुशिंग (वय 20, रा. घरकुल, चिखली) याला अजमेरा कॉलनी, पिंपरी मधून सापळा रचून ताब्यात घेतले. त्याची चौकशी केली असता, त्याच्याकडे मोटार सायकल, चाव्यांचा बंडल, कटावणी मिळून आली. त्याच्याकडे कसून चौकशी केली असता त्याने त्याच्या विकास सुनील घोडके (वय 21, रा. वडगाव शेरी) आणि कुलदीप तानाजी शिंदे (वय 20, रा. चंदननगर) या दोन मित्रांनी मिळून पाच ठिकाणी घरफोड्या केल्याचे निष्पन्न झाले. त्यांनी घरफोड्यांमध्ये चोरलेले सोन्याचे दागिने मन्नपुरम गोल्ड फायनान्समध्ये गहाण ठेवले होते. पिंपरी पोलिसांनी दोन मोटारसायकल आणि मन्नपुरम गोल्ड फायनान्स मधून 20 तोळे सोन्याचे दागिने असा एकूण 6 लाख 65 हजार रुपयांचा ऐवज जप्त केला. यामुळे पिंपरी पोलीस ठाण्यातील 5 गुन्हे उघड झाले आहेत.

त्यानंतर पिंपरी पोलिसांनी गुरुवारी (दि. 6) सलमान गौस शेख (वय 24, रा. मिलिंदनगर, पिंपरी) याच्याकडून 1 लाख 55 हजार रुपये किमतीच्या पाच मोटारसायकल जप्त केल्या. यामुळे पिंपरी पोलीस ठाण्यातील पाच गुन्हे उघड झाले. तसेच राहुल हिरालाल भांडेकर (वय 20, रा. खराळवाडी, पिंपरी) याला ताब्यात घेऊन त्याच्याकडून 13 हजार रुपये किमतीचे मोबाईल, मोबाईल फोन असा ऐवज जप्त केला. यामुळे पिंपरी पोलीस ठाण्यातील घरफोडीचा एक गुन्हा उघडकीस आला आहे. कोंबिंग ऑपरेशन करून त्यामध्ये दोन जणांना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून एक देशी बनावटीचे पिस्टल आणि एक गावठी कट्टा असा 38 हजार रुपयांचा ऐवज जप्त केला.

वरील वेगवेगळ्या कारवायांमध्ये पिंपरी पोलिसांनी 14 आरोपींना अटक केली असून त्यांच्याकडून एकूण 14 लाख 38 हजार रुपयांचा ऐवज जप्त केला आहे. यामुळे पिंपरी पोलीस ठाण्यातील 18 गुन्हे उघड झाले आहेत. ही कामगिरी पोलीस आयुक्त आर के पद्मनाभन, अप्पर पोलीस आयुक्त मकरंद रानडे, पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त सतीश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठल कुबडे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) रंगनाथ उंडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक सतीश कांबळे, पोलीस उप निरीक्षक विठ्ठल बढे, पोलीस हवालदार राजेंद्र भोसले, शाकीर जिनेडी, नागनाथ लकडे, पोलीस नाईक महादेव जावळे, श्रीकांत जाधव, संतोष दिघे, राजू जाधव, पोलीस शिपाई संतोष भालेराव, रोहित पिंजरकर, उमेश वानखेडे, विद्यासागर भोते, अविनाश देशमुख, गणेश खाडे, नामदेव राऊत, गणेश करपे, सोमेश्वर महाडिक, विकास रेड्डी, विष्णू भारती, महिला पोलीस शिपाई कीर्ती घारगे यांच्या पथकाने केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
HB_POST_END_FTR-A2
You might also like