Pune : पोलीस हुतात्मा स्मृतिस्थळावर पोलीस स्मृतिदिना निमित्त ‘शोक कवायत’

एमपीसी न्यूज – मागील एका वर्षाच्या कालावधीत ज्या पोलीस अधिकारी व कर्मचा-यांना आपले कर्तव्य बजावत असताना वीरमरण आले, अशा संपूर्ण भारत देशातील सर्व राज्यामधील पोलीस अधिकारी व कर्मचारी यांच्या स्मृतिला सोमवारी (दि. 21) सकाळी महाराष्ट्र राज्य पोलीस संशोधनकेंद्र येथील पोलीस हुतात्मा स्मृतिस्थळावर पोलीस दलाच्या वतीने आदरांजली वाहण्यात आली. 21 ऑक्टोबर हा दिवस देशातील विविध पोलीस दलाच्या वतीने पोलीस स्मृतिदिन म्हणून पाळला जातो.

या कार्यक्रमासाठी सेवानिवृत्त पोलीस अधिकारी सुधाकर आंबेडकर,रवींद्र बोडखे, शेषराव सुर्यवंशी, विक्रम पाटील, अरूण वालतुरे, सतीश पाटील, राम मांडुरके तसेच पुणे शहर आयुक्तालय, पुणे ग्रामीण, बिनतारी संदेश विभाग, गुन्हे अन्वेषण विभाग, महाराष्ट्र राज्य, मोटार परिवहन विभाग या
विभागातील 107 वरिष्ठ पोलीस अधिकारी व 235  कर्मचारी हजर होते.

पुणे येथे पाषाण रोडवर महाराष्ट्र राज्य पोलीस संशोधन केंद्र,(सीपीआर),पुणे येथील पोलीस हुतात्मा स्मृति स्मारकावर सकाळी ८ वाजता सुनील श्रीधर गोसावी, जिल्हा न्यायाधीश-2 व अपर सत्र न्यायाधीश यानी तसेच पुणे शहर पोलीस आयुक्त डॉ. के.व्यंकटेशम्‌, पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई, अपर पोलीस महासंचालक,गुन्हे अन्वेषण विभाग अतुलचंद्र कुलकर्णी, अपर पोलीस महासंचालक बिनतारी संदेश विभाग रितेश कुमार, अपर पोलीस महासंचालक,कारागृह विभाग सुनील रामानंद, ,पोलीस सह आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे, अपर पोलीस आयुक्त डॉ.संजय शिंदे, अपर पोलीस आयुक्‍त गुन्हे अशोक मोराळे आदी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पुष्पचक्र अर्पण केले. या प्रसंगी शोक कवायतीचे आयोजन करण्यात आले होते.

शोक कवातीसाठी पुणे शहर पोलीस आयुक्‍तालयाकडील व पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्‍तालयाकडील प्रत्येकी एक तुकडी अशा एकुण दोन तुकडया मध्ये पोलीस अधिकारी व कर्मचा-यांनी भाग घेतला. तसेच पोलीस मुख्यालय,पुणे शहरकडील वाद्य-वृंदयांनी भाग घेतला. परेड कमांडर सहायक पोलीस आयुक्त विजय चौधरी,गुन्हे व सेकंड कमांडर रामकृष्ण गोटमवाड, राखीव पोलीस निरीक्षक,पोलीस मुख्यालय,शिवाजीनगर,पुणे शहर यांनी कवायतीचे नेतृत्व केले.

लडाख येथे 21 ऑक्टोबर 1959  या दिवशी हॉटस्प्रिग या कडाक्याच्या थंडीच्या ठिकाणी, सुसज्ज चिनी सैन्याने केंद्रीय निमलष्करी पोलीस दलाच्या 10 शुर शिपायांच्या तुकडीवर पूर्व तयारीनिशी अचानक हल्ला केला. त्यावेळी त्या 10 शूरवीरांनी शत्रुशी निकराने लढत देऊन देशासाठी आपला देह धारातीर्थी ठेवला. तेव्हापासुन २१ ऑक्टोबर हा दिवस देशातील विविध पोलीस दलाचे वतीने पोलीस स्मृतीदिन म्हणून पाळला जातो. पोलीस स्मृतीदिनाचे दिवशी एकाच वेळी देशातील सर्व पोलीस मुख्यालयाचे ठिकाणी मागील एका वर्षाचे कालावधीत ज्या पोलीस अधिकारी व कर्मचा-यांना आपले कर्तव्य बजावत असताना वीरमरण आले,त्या सर्वांना आदरांजली वाहण्यात येते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.