Pimpri : पार्किंग नियमांची पिंपरी पोलिसांकडून उजळणी

पोलीस ठाण्याच्या हद्दीत महत्वाच्या चौकांमध्ये लावले वाहतूक नियम जनजागृतीपर बॅनर

एमपीसी न्यूज – शहरात वाहतूक व्यवस्था सुरळीत राहण्यासाठी पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय आणि वाहतूक विभागाकडून विविध उपाय योजना राबविण्यात येत आहेत. सर्वच पोलीस ठाण्यांनी शहरातील वाहतूक व्यवस्था सुधारण्यासाठी कंबर कसली आहे. पिंपरी पोलीस ठाण्याच्या वतीने पोलीस ठाण्याच्या हद्दीत आज (मंगळवारी) पार्किंग नियमांबाबत जनजागृतीपर बॅनर लावण्यात आले.

पिंपरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत जुना पुणे-मुंबई महामार्गावरील सर्व चौकांमध्ये वाहतूक नियम आणि जनजागृतीपर बॅनर लावण्यात येणार आहेत. पिंपरी पोलीस ठाण्यासमोरील चौकामधून या मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला. या चौकामध्ये ‘सिग्नलच्या आजूबाजूस 100 मीटर अंतरापर्यंत कोणत्याही प्रकारचे वाहन उभे करू नये. आढळल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल. तसेच वाहन जप्त करण्यात येईल.’ अशा आशयाचा बॅनर लावण्यात आला आहे.

सिग्नलच्या आजूबाजूला रस्त्याच्या बाजूला वाहने पार्क केल्यामुळे सिग्नलवर थांबलेल्या वाहनांना अडथळा होतो. सिग्नलवर जास्त वाहने थांबू शकत नाहीत. यामुळे वाहनांच्या लांब पर्यंत रांगा लागतात. सिग्नलच्या वेळेत सर्व वाहने सिग्नल पार करू शकत नाहीत. थांबलेल्या वाहनांमुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होतो. पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय आणि वाहतूक विभागाकडून वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणा-या वाहन चालकांवर कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे. कारवाई पूर्वी नागरिकांना नियमांची उजळणी करून देण्याच्या उद्देशाने हे बॅनर लावण्यात आले आहेत, अशी माहिती पिंपरी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठल कुबडे यांनी दिली.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.