Pimpri: महामारीच्या संकटातही राजकीय पदाधिका-यांनी हात धुऊन घेतले? थेट पद्धतीने दीड कोटीची मास्क खरेदी
राजकीय पदाधिका-यांच्या मर्जीतल्या संस्थाकडून मास्कची खरेदी

एमपीसी न्यूज – शहरात कोरोनाचा संसर्ग वाढत असताना राजकीय पदाधिका-यांनी महामारीतही आपली राजकीय पोळी भाजून घेतली आहे. झोपडीधारकांना मास्क देण्याकामी कोणतीही निविदा न मागविता, करारनामा न करता पुरवठाधारकांकडून थेट पद्धतीने कापडी मास्क खरेदी केले आहेत. राजकीय पदाधिका-यांच्या मर्जीतल्या संस्थाकडूनच पंधरा लाख झोपडीधारकांसाठी मास्कची खरेदी केली आहे.
शहरात कोरोनाचा विळखा घट्ट होत आहे. रुग्ण संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. शहराच्या विविध भागात रुग्ण सापडत आहेत. आर्थिक गणिते डोळ्यासमोर ठेऊन नगरसेवकांनी शहरातील नागरिकांना मोफत मास्क वाटप करण्यासाठी महापालिका आयुक्तांकडे पत्रव्यवहार केला होता. त्यावर तत्काळ बैठक घेत मास्क खरेदीचा निर्णय घेण्यात आला.
शहरात झोपडपट्टींची संख्या मोठी आहे. झोपडपट्टीत कोरोना विषाणूचा शिरकाव होऊ नये यासाठी महापालिकेने खबरदारी घेतली. परंतु, काही झोपडपट्यांना कोरोनाने वेढा घातला आहे. प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून शहरातील प्रत्येक झोपडीस आठ नग कापडी मास्क मोफत वाटप करण्याचे निश्चित केले.
त्यासाठी कापडी मास्क तातडीने खरेदी करण्याचा निर्णय घेण्यात आला. एका मास्कची किंमत दहा रूपये ठरविण्यात आली. कोणतीही निविदा प्रक्रीया न राबविता दहा रूपये प्रति नग या किमतीने तब्बल दीड लाख मास्क करारनामा न करता थेट पद्धतीने पुरवठा धारकांकडून खरेदी करण्यात आले.

शहरातील विविध 13संस्थांकडून 15 लाख मास्क खरेदी केले आहेत. त्यामध्ये पिंपळेगुरव मधील कुलस्वमिनी आणि महालक्ष्मी महिला बचतगटामार्फत प्रत्येकी दीड लाख मास्क (30 लाख रूपये खर्च), पिपरीतील आरंभ एंटरप्रायजेसकडून 30 लाखाचे 3 लाख मास्क, भोसरीतील साई एंटरप्रायेजसमार्फत 30 लाखाचे 3 लाख मास्क, भोसरीतीलच ओम क्रीएटीव्ह टेलरकडून 3 लाखाचे 30 हजार मास्क घेण्यात आले.
चिंचवड येथील गुरूनूर एंटरप्रायजेसकडून 18 लाखाचे 1 लाख 80 हजार मास्क, आरंभ महिला बचतगट आणि चिंचवड येथील आनंद एंटरप्रायजेसकडून प्रत्येकी 5 लाखाचे 50 हजार मास्क, चिंचवड येथील मातोश्री आणि निगडीतील श्रीकृष्ण महिला बचत गटामार्फत प्रत्येकी 2 लाखाचे 20 हजार मास्क, अॅडीसन लाईफ सायन्स यांच्याकडून 10 लाखाचे 1 लाख मास्क, संत तुकारामनगर येथील दिगंबरा महिला बचत गटाकडून 13 लाखाचे 1 लाख 30 हजार मास्क आणि महाविर कॉर्पोरेशनमार्फत 2 लाखाचे 20 हजार मास्क खरेदी करण्यात आले आहे.
हे सर्व पुरवठादार नगरसेवकांच्या जवळचे आहेत.
तातडीची बाब म्हणून थेट पद्धतीने मास्कची खरेदी – नामदेव ढाकेशहरात झोपडपट्टींची संख्या मोठी आहे. झोपडपट्टीत कोरोना विषाणूचा शिरकाव होऊ नये म्हणून महापालिकेकडून खबरदारी घेण्यात आली आहे. झोपडीपट्टीतील नागरिकांसाठी मास्क खरेदी केले आहेत. त्याचे दर निश्चित करून मास्क खरेदी केली आहे. त्यामुळे नगरसेवकांच्या संस्थांकडून मास्क खरेदी केले, असे नाही. हे मास्क महिला बचत गटांकडूनही घेतले आहेत. त्याची किंमतही निश्चित केली होती. त्यामुळे कोणी पुरविले, किती पुरविले हा प्रश्नच नाही. तातडीची बाब म्हणून थेट पद्धतीने खरेदी केली आहे. पहिल्यापेक्षा या मास्कची किंमत कमी आहे, असे सभागृह नेते नामदेव ढाके यांनी सांगितले.