Pimpri: भाजप, ‘पीसीएनडीटीए’, राष्ट्रवादी अन् पुलाचे राजकारण

एमपीसी न्यूज – ‘पीसीएनटीडी’तर्फे औंध ते काळेवाडी साई चौक येथे उभारण्यात आलेला पूल वाहतुकीसाठी खुला करण्यावरुन महापालिकेतील सत्ताधारी भाजप आणि प्राधिकरण प्रशासन यांच्यात चांगलीच जुंपली आहे. महापौरांनी वाहतुकीसाठी खुला केलेला पूल प्राधिकरणाने मुरुमाचा भराव टाकून बंद केला. त्यानंतर मुरुम काढून पुन्हा पूल सुरु करण्यासाठी महापौर भाजप पदाधिका-यांसह काल तिथे गेले. परंतु, पोलिसांच्या भीतीने मुरुम काढण्यात आला नाही. त्यामुळे घोषणा देत भाजप पदाधिकारी रिकाम्या हाताने परत आले. राष्ट्रवादीच्या दबावाखाली प्राधिकरणाने पुल बंद केल्याचा आरोप भाजपने केला.

पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाकडून  औंध ते काळेवाडी साई चौक येथे पूल उभारण्यात आहे. 700  मीटर लांबी आणि 8 मीटर रुंदी असलेल्या पुण्याकडून काळेवाडी, डांगे चौकाकडे जाणाऱ्या पुलाचे काम पूर्ण झाल्याचा दावा करत महापौर उषा ढोरे यांनी सोमवारी (दि. 9) भाजप पदाधिका-यांसह पुलाचे लोकार्पण केले. परंतु, पुलाचे काम अर्धवट आहे. काम पूर्ण झाल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते प्राधिकरण प्रशासन पुलाचे उद्घाटन करणार होते. भाजपने केवळ श्रेयासाठी पुलाचे उद्घाटन केल्याचा आरोप विरोधी पक्षनेते नाना काटे यांनी केला होता.

त्यानंतर पुलाचे काम अर्थवट असल्याचे सांगत प्राधिकरण प्रशासनाने दोनही बाजूने मुरुमाचे भराव टाकून पुल बंद केला होता. त्यानंतर आज (बुधवारी) पुन्हा महापौर ढोरे भाजप पदाधिकारी, नगरसेवकांसह पुलावरील मुरुम काढून पूल खुला करण्यासाठी गेले होते. परंतु, तिथे पोलीस हजर होते. कायदा हातात घेऊ नका अन्यथा  गुन्हे दाखल केले जातील, अशी तंबी दिली. त्यामुळे भाजप पदाधिका-यांनी माघार घेतली. प्राधिकरणाने दोन दिवसात पूल खुला करावा, अन्यथा शहर भाजपाच्या वतीने आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला.

यावेळी सभागृह नेते नामदेव ढाके, नगरसेवक तुषार कामठे, नगरसेविका  उषा मुंढे, ममता गायकवाड, निर्मला काटे, आरती चौंधे, सविता खुळे उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.