Pimpri : प्रदूषणाने ओलांडली धोकादायक पातळी;  बांधकामे आठ दिवस बंद, हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी रोड वॉशर सिस्टीमद्वारे साफसफाई

एमपीसी न्यूज – दिवाळीनिमित्त फोडण्यात येणारे फटाके, वाहनांचा धूर, बांधकामांमुळे शहरातील हवेची पातळी धोकायदाक झाली आहे. त्यामुळे महापालिका प्रशासनाकडून (Pimpri) विविध उपाययोजना हाती घेतल्या आहेत. शहरातील सर्व बांधकामे 19 नोव्हेंबरपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी दिले आहेत. तसेच हवेच्या गुणवत्तेत सुधारणा करण्यासाठी रस्त्यांची रोड वॉशर सिस्टीम असलेल्या वाहनांद्वारे साफसफाई करण्यात येत आहे.

लक्ष्मीपूजन, नरक चतुर्दशीच्या दिवशी शहरातील सूक्ष्म धूलिकणांमध्ये दुप्पट वाढ झाली असून, हवेची गुणवत्ता खालावली आहे. हिवाळ्यात जमिनीवरील धुलिकण हेवत जाऊन हवा प्रदूषित होते. त्यात फटाक्‍यांची भर पडत आहे. त्यामुळे शहरातील हवेची पातळी धोकादायक श्रेणीत गेली आहे. शहरातील वायू प्रदूषण रोखण्यासाठी (Pimpri) महापालिकेच्या वतीने 32 प्रभागांमध्ये 16 वायू प्रदूषण नियंत्रण पथकांची नेमणूक करण्यात आली आहे. या पथकांद्वारे प्रभागातील बांधकाम स्थळांना भेटी देऊन छायाचित्रे, चित्रफितीद्वारे त्याची नोंद घेण्यात येत आहे.

या दरम्यान प्रदूषण नियंत्रण तरतुदींचे पालन न केल्याचे उघड झाल्यास दंड आकारला जात आहे. नोटीस देऊन कामाची जागा सील केली जात आहे. दैनंदिन वायू प्रदूषण निरीक्षण केले जाते. शहरातील (Pimpri) ढाबा, बेकरी, रेस्टॉरंट आणि हॉटेल्स मालकांनी स्वयंपाकघरात पर्यावरणपूरक पर्यांयांचा वापर करावा. तसेच डिझेल जनरेटरचा वापर करण्याचे शक्‍यतो टाळावे. शहरातील हवेची गुणवत्ता वाढविण्यासाठी उद्योगांच्या वायू प्रदूषणावरही बारकाईने लक्ष ठेवले जाणार आहे. भारतीय उष्णकटिबंधीय हवामानशास्त्र संस्थेच्या (आयआयटीएम) सफर या संकेतस्थळाच्या माध्यमातून ही नोंद झाली आहे. अतिसूक्ष्म धूलिकण (पीएम 2.5) आणि सूक्ष्म धूलिकणात (पीएम 10) वाढ झाल्याने शहराच्या काही भागातील हवेची गुणवत्ता चक्क खराब श्रेणीपर्यंत पोचली होती. सफर या संकेतस्थळाच्या नोंदीनुसार भोसरी, वाकडमधील भूमकर चौक, निगडी या भागातील हवेची गुणवत्ता सर्वात खराब श्रेणीत नोंदली गेली आहे.

फटाक्‍यांसह आदी बाबींमुळे शहरातील काही भागाची हवेची पातळी खालावली आहे. (Pimpri) पालिकेच्या वतीने विविध उपाय योजना करण्यात येत आहेत. हवेच्या गुणवत्तेत सुधारणा करण्यासाठी रस्त्यांची रोड वॉशर सिस्टीम असलेल्या दोन वाहनांद्वारे साफसफाई करण्यात येत आहे. मुख्य चौकांचे हवा प्रदुषण कमी करण्यासाठी मुव्हेबल फॉग कॅनन डस्ट सप्रेशन प्रणाली 5 नवीन वाहनांवर बसविण्यात आली आहे. त्याव्दारे प्रदूषण कमी करण्याचा प्रयत्न करण्यात येत असल्याचे पर्यावरण विभागाचे सह शहर अभियंता संजय कुलकर्णी यांनी सांगितले.

काय काळजी घ्यावी?

प्रदूषित हवेत जास्त काळ राहणे टाळा
बाहेरील शारीरिक श्रम अथवा व्यायाम टाळा
बाहेर जाताना मास्कचा वापर करा
लहान मुले, वृध्दांची काळजी घ्या
श्‍वसनाचा त्रास झाल्यास तातडीने डॉक्‍टरांचा सल्ला घ्या

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.