Pimpri: सकारात्मक ! ‘लॉकडाऊन’ काळात शहरात पक्षी, वन्यजीव, कीटक यांच्या संख्येत वाढ

Pimpri: Positive! An increase in the number of birds, wildlife and insects in the city during the 'lockdown' period चिमण्यांनी म्हणजेच सुगरणींनी पारिजातक सारख्या लवचिक फांद्या असणाऱ्या झाडांवर सुंदर खोपी बनवलेली आहेत.

एमपीसी न्यूज – सध्या कोरोनामुळे सर्वांचे दैनंदिन जीवन पूर्णपणे विस्कळीत झालेले आहे. कोरोनाचा हाहाकार सर्व ठिकाणी सुरू असला तरी शहरातून एक सकारात्मक बाब समोर आली आहे. लॉकडाऊनच्या काळात शहर परिसरात पक्षी, वन्यजीव व कीटक यांच्यात लक्षणीय वाढ झाल्याचे दिसून आले आहे.

प्राधिकरण नागरी सुरक्षा कृती समितीच्या पर्यावरण विभागाच्या अभ्यास गटाने यासंदर्भात काही महत्वपूर्ण निरीक्षणे नोंदवली आहेत.

समितीचे अध्यक्ष विजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली विजय मुनोत, विजय जगताप, संतोष चव्हाण, संदीप सकपाळ, अर्चना घाळी, सतीश देशमुख, विशाल शेवाळे, अजय घाडी, सतीश मांडवे यांनी वाल्हेकरवाडी, रावेत, प्राधिकरण, निगडी, शाहूनगर,बालेवाडी, पिंपळे गुरव, दुर्गादेवी उद्यान या परिसरात ही निरिक्षणे नोंदवली आहेत.

या निरिक्षणानुसार, प्राधिकरण उद्यानांच्या परिसरात कोकिळा, बुलबुल, पोपट, चिमण्या, टिटवी, धनेश, केकाटी, गव्हाणी घुबड, कावळे, पारवे, खारुताई, मधमाशी, फुलपाखरे ही मोठ्याप्रमाणात दिसून येत आहेत. त्यामुळे या पक्षांच्या घरट्यांमध्ये सुद्धा वाढ दिसून आली. यामुळे उद्यानांनमध्ये पहाटेच्या वेळी पक्षांचा चिवचिवाटही वाढला आहे.

बिजलीनगरच्या रेल विहार सोसायटीच्या परिसरात गव्हाणी घुबडांची संख्याही वाढलेली दिसून आली. उत्कर्ष कॉलनी स्पाईन रस्ता वाल्हेकरवाडी चिंतामणी चौकाजवळ तसेच पिंपळे गुरव परिसरात मोरांचे दर्शनही झाले.

दुर्गादेवी उद्यानांच्या टेकडी परिसरात माकडांच्या टोळीचे वास्तव्य बऱ्याच दिवस होते. बालेवाडी परिसरात कावळ्यांनी तर द्रुतगती मार्गाच्या मधोमध असणाऱ्या दिव्यांच्या खांबावरच आपली घरटी बनवलेली दिसून आली. सलग 10 ते 15 खांबांवरती जाड काटक्यांची घरटी लक्ष वेधून घेत आहेत.

प्राधिकरण परिसरात मधमाशांनी तर उच्चदाब वीज वाहिन्यांच्या उंच टॉवरचा सहारा घेऊन ‘मधाचे पोळ’ तयार केलं आहे. चिमण्यांनी म्हणजेच सुगरणींनी पारिजातक सारख्या लवचिक फांद्या असणाऱ्या झाडांवर सुंदर खोपी बनवलेली आहेत. जुलै महिना हा पक्षांचा प्रजनन काळ असल्याने सुगरणींची (मादी प्रजातींची) घरटी बनवण्याची लगबग दिसून येत आहे.

या संदर्भात पर्यावरण अभ्यासक प्राधिकरण नागरी सुरक्षा कृती समितीचे अध्यक्ष विजय पाटील म्हणाले, शहरपरिसरात लॉकडाऊनच्या काळात मानवी हस्तक्षेप व वर्दळ कमी झाल्यामुळे प्रदूषणात मोठ्या प्रमाणात घट झाली.

निसर्गाने त्याचे काम सुरूच ठेवले. त्यामुळे हिरवाईमध्ये वाढ झाली, पक्ष्यांच्या अधिवासासाठी उपयुक्त असणाऱ्या वृक्षांची संख्याही वाढीस लागली. त्याचा आल्हाददायक परिणाम वन्यजीव, कीटक, पक्षी यांच्या संख्यावाढीमध्ये दिसून येत आहे. शहराच्या पर्यावरणाच्या दृष्टीने ही बाब नक्कीच आनंददायी आहे.

पर्यावरण अभ्यासक विजय मुनोत म्हणाले, प्राधिकरण परिसरामध्ये उद्यानांची संख्या जास्त असल्याने पक्ष्यांनी त्यांचा मोर्चा आता या उद्यानातील झाडांकडे वळविला आहे. त्यामुळे पक्ष्यांच्या आवाजाचे मधुर गुंजन आता फ्लॅटमध्ये व सोसायटी परिसरातील नागरिकांना दरोरोज पहाटेच्या वेळी कानी पडत आहे.

ही महत्वपूर्ण बाब पर्यावरणपूरक आहे. बाल्कनीतील पक्षी प्रयोग सुद्धा यशस्वी होत आहे. प्राधिकरण नागरी सुरक्षा कृती समितीचे पर्यावरण विभागाचे अभ्यासक सदस्य याबाबत दरवर्षी निरीक्षण नोंदविण्याचे काम करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.