BNR-HDR-TOP-Mobile

Pimpri : रामकृष्ण मोरे यांना श्रद्धांजली फक्त ‘यांच्या’ पराभवाने मिळेल; कुटुंबकल्याणाला घरी पाठवा

चिंचवड परिसरात लागलेल्या फलकाने चर्चेला उधाण

एमपीसी न्यूज – दिवंगत रामकृष्ण मोरे यांना श्रद्धांजली फक्त ‘यांच्या’ पराभवाने मिळेल. कुटुंबकल्याणाला घरी पाठवा, गुलामी हटाव….मतदारांनी आजोबांना मतं दिली, पुतण्याला दिली. आता नातवाला पण….माफ करा, आम्ही तुमचे गुलाम नाहीत…..अशा मजकूराचे फलक चिंचवड परिसरात लागल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. राष्ट्रवादीचे उमेदवार पार्थ पवार यांच्याविरोधात शहरातील सजग नागरिकाने हे फलक लावले आहेत.

दिवंगत शिक्षणमंत्री प्रा. रामकृष्ण मोरे हे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे कट्टर विरोधक म्हणून परिचित होते. राष्ट्रवादीची स्थापना झाल्यानंतर त्यांच्यातील संघर्ष वाढला. पिंपरी-चिंचवड महापालिकेत काँग्रेसची एकहाती सत्ता होती. रामकृष्ण मोरे यांचे वर्चस्व होते. राष्ट्रवादीच्या स्थापनेनंतर पक्षाने महापालिकेवर लक्ष केंद्रित केले. महापालिकेतील काँग्रेसची सत्ता उलथवून आणि मोरे सरांचे वर्चस्व संपवून राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी महापालिका ताब्यात घेतली होती. कालांतराने पवारांनी शहरातील काँग्रेस संपवून टाकली. त्यामुळे काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये पवार यांच्याबाबतची नाराजी सातत्याने दिसून येते.

मावळ लोकसभा मतदारसंघातून शरद पवार यांचे नातू आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार निवडणूक लढवित आहेत. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लागलेल्या या फलकांनी शहरवासियांच्या लक्ष वेधले आहे. चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहाच्या परिसरात हे फलक झळकले आहेत. दिवंगत रामकृष्ण मोरे यांना श्रद्धांजली फक्त ‘यांच्या’ पराभवाने मिळेल. कुटुंबकल्याणाला घरी पाठवा, गुलामी हटाव….मतदारांनी आजोबांना मतं दिली, पुतण्याला दिली. आता नातवाला पण….माफ करा, आम्ही तुमचे गुलाम नाहीत….- सजग नागरिक असा मजकूर असलेले फलक झळकल्याने चर्चेला उधाण आले आहे.

HB_POST_END_FTR-A2

.