Pimpri : गणेश उत्सवाचे पावित्र्य राखावे – रामनाथ पोकळे

महापालिका, पोलीस आणि गणेश मंडळांची शांतात बैठक

एमपीसी न्यूज – गणेश उत्सवात मोठ्या भक्ती भावाने गणेशाची प्रतिष्ठापना करण्यात येते. मोठा आरास केला जातो. मात्र, दिवसभर नको ती गाणी वाजवली जातात. अपवाद वगळता गणेशोत्सवाचे पावित्र्य राखले जात नाही. संघटन, भक्ती, शांती या गोष्टी वाढीस लागण्यासाठी गणेशोत्सव आणि अन्य उत्सव साजरे करण्यास सुरुवात झाली. पण, आता उत्सवांचा मूळ उद्देश राहिला का? हे ज्याचे त्याने तपासले पाहिजे. सर्व गणेश मंडळांनी पर्यावरणपूरक पद्धतीने, शांततेत गणेशोत्सव साजरा करावा, असे आवाहन पिंपरी-चिंचवडचे अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे यांनी केले.

महापालिका, पोलीस आणि गणेश मंडळांची पर्यावरणपूरक गणेशोत्सव शांतता बैठक पिंपरी येथे पार पडली. यावेळी अपर आयुक्त रामनाथ पोकळे बोलत होते.

  • यावेळी पक्षनेते एकनाथ पवार, विरोधी पक्षनेते नाना काटे, स्थायी समिती अध्यक्ष विलास मडिगेरी, राहुल कलाटे, सचिन चिखले, शाम लांडे, तुषार हिंगे, सुजाता पालांडे, आरती चोंदे, अनुराधा गोरखे, निर्मला कुटे, पोलीस उपायुक्त सुधीर हिरेमठ, स्मिता पाटील, विनायक ढाकणे, सहाय्यक पोलीस आयुक्त, पोलीस निरीक्षक आदी उपस्थित होते.

यावेळी रामनाथ पोकळे म्हणाले, सर्व गणेशोत्सव मंडळांना संबंधित पोलीस ठाण्यात परवानग्या मिळतील. दोन पोलीस ठाण्यांच्या हद्दीतून मिरवणूक जात असेल तर त्याची परवानगी सहाय्यक पोलीस आयुक्त स्तरावर घ्यावी. त्यापेक्षा मोठ्या हद्दीतून मिरवणूक जात असेल तर पोलीस उपायुक्तांनी परवानगी घ्यावी. मंडळांनी वर्गणी देण्यासाठी कुणालाही जबरदस्ती करू नये, देणा-याच्या इच्छेने वर्गणी घ्यावी. गणेश उत्सव कालावधीत स्टेजजवळ कायम किमान पाच कार्यकर्ते, स्वयंसेवक असायलाच हवे. देखावे पाहण्यासाठी येणा-या नागरिकांची गैरसोय होणार नाही, याची काळजी घ्यावी.

  • त्यानंतर पोकळे पुढे म्हणाले, यंदाचा गणेशोत्सव पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाचा दुसरा गणेशोत्सव आहे. मागील वर्षी आयुक्तालय सुरु झाल्यानंतर पहिला उत्सव हाच असल्याने बंदोबस्त पाळण्यात अनेक अडचणी आल्या. पण त्यातूनही मार्ग काढून कमी मनुष्यबळ असूनही बंदोबस्त चोख ठेवला. मागील एक वर्षात मनुष्यबळ वाढीमध्ये फार मोठा फरक पडलेला नाही. अजूनही आयुक्तालयापुढे मनुष्यबळाचा प्रश्न आहे. पण बाहेरून बंदोबस्त मागवून, आहे त्या पोलिसांना कामाला लावून बंदोबस्त चोख ठेवला जाईल.

दिनांक 7, 8, 9 आणि 12 सप्टेंबर रोजी लाऊडस्पीकरसाठी रात्री 12 वाजेपर्यंत परवानगी देण्यात आली आहे. इतर दिवशी लाऊडस्पीकरसाठी रात्री 10 पर्यंतच परवानगी आहे. उल्लंघन करणा-यांवर कठोर कारवाई केली जाणार आहे. मनुष्यबळाची कमतरता लक्षात घेऊन स्पेशल पोलीस ऑफिसर नेमण्यात येणार आहेत. स्पेशल पोलीस ऑफिसर, स्वयंसेवी संस्थांचे स्वयंसेवक यांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे. पुण्यातील विघ्नहर्ता न्यासच्या धर्तीवर पिंपरी-चिंचवड शहरासाठी देखील एक न्यास असायला हवे, यासाठी धर्मादाय आयुक्तांकडे प्रस्ताव पाठवण्यात आला आहे. त्याला मान्यता मिळताच त्याचेही कामकाज सुरु होणार आहे.

  • जातीय, धार्मिक तेढ निर्माण करणारे देखावे नसावेत. भारतीय राज्यघटनेतील कलम 370 रद्द केल्यानंतर संपूर्ण देशात सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. पिंपरी-चिंचवड शहरात देखील नागरिकांनी सतर्क राहायला हवे. संशयित वस्तू, व्यक्ती, वाहन आढळून आल्यास त्याबाबत तात्काळ स्थानिक पोलिसांना माहिती द्यावी. गणेशोत्सव शांततेत, भक्तिभावपूर्ण वातावरणात आणि पर्यावरणपूरक पद्धतीने साजरा करावा, असे आवाहन देखील पोकळे यांनी केले.

यावेळी पक्षनेते एकनाथ पवार म्हणाले, पिंपरी-चिंचवड शहराला स्वतंत्र पोलीस आयुक्तालय मिळाले. मागील वर्षी आयुक्तालयाचा पहिला गणेशोत्सव होता. अतिशय कमी मनुष्यबळ असताना देखील त्यांनी चांगल्या पद्धतीने बंदोबस्त ठेवला. यावर्षी देखील असाच चोख बंदोबस्त ठेवतील. सर्व मंडळांनी पोलीस आणि प्रशासनाशी समन्वय ठेवावा. सण-उत्सवांच्या काळात पोलीस सामाजिक संस्थांचे स्वयंसेवक अहोरात्र परिश्रम घेतात. त्यांना जास्त त्रास होणार नाही, याची काळजी घ्यावी. सांगली, कोल्हापूर जिल्ह्यात आलेल्या पुरामुळे अनेक संसार उघड्यावर आले आहेत. आपल्या मंडळांच्या वतीने पूरग्रस्त नागरिकांना जास्तीत जास्त मदत करण्याचा प्रयत्न करावा.

  • विरोधी पक्षनेते नाना काटे म्हणाले, गणेशोत्सव परवानगीसाठी एक खिडकी योजना सुरु करावी. ज्यामुळे गणेश मंडळांची पायपीट होणार नाही. तसेच मंडळांनी मूर्तीदान करायला हवे. अनाथ आश्रमांना मूर्ती भेट द्यायला हव्यात. दान मिळालेल्या मूर्ती अनाथ आश्रमांकडून पुढच्या वर्षी डागडुजी करून विकल्या जातील. त्यातून येणा-या पैशांतून त्यांच्या मूलभूत गरजा भागतील.

अतिरिक्त आयुक्त संतोष पाटील म्हणाले, पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील गणेशोत्सवाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष असते. इथला गणेशोत्सव जो पायंडा घालून देईल तो राज्यभर पसरेल. गणेशोत्सवात विघटनशील वस्तूंचा वापर करावा. कृत्रिम विसर्जन घाटात गणेश विसर्जन करावे. प्रभाग कार्यालयात एक खिडकी योजना सुरु करण्यात येणार आहे. गणेशोत्सवापूर्वी शहरातील खडे बुजविण्याचे प्रयत्न केला जाईल. गणेश मंडळांनी खड्डेमुक्त मजबूत मंडप उभारावेत, असे आवाहन देखील पाटील यांनी केले.

  • गणेश मंडळांकडून पोलीस आणि महापालिका प्रशासनाला काही सूचना करण्यात आल्या. केलेल्या सूचनांप्रमाणे अवलंब करण्याचे आश्वासन प्रशासनाकडून देण्यात आले. सूत्रसंचालन सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे यांनी सूत्रसंचालन केले. प्रास्ताविक पोलीस उपायुक्त सुधीर हिरेमठ यांनी केले. आभार विलास मडिगेरी यांनी मानले.
MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
HB_POST_END_FTR-A2
You might also like