Pimpri: ‘स्मार्ट सिटी’च्या निविदेत रिंग; निविदा मॅनेज करण्यासाठी ‘सीएम’ कार्यालयातून दबाव’

विरोधी पक्षनेते दत्ता साने यांचा आरोप 

एमपीसी न्यूज –  पिंपरी-चिंचवड शहरात स्मार्ट सिटी अंतर्गत करण्यात येणार्‍या नेटवर्किंगच्या कामासाठी काढण्यात आलेल्या 250 कोटीच्या निविदेत ‘रिंग’ करुन  एल अ‍ॅन्ड टी कंपनीला हे काम देण्याचा प्रयत्न होत आहे. याच कंपनीला काम देण्याबाबत मुख्यमंत्री कार्यालयातून दबाव येत असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते दत्ता साने यांनी आज (शनिवारी) केला. तसेच ही निविदा रद्द करुन फेरनिविदा काढण्याची मागणी त्यांनी केली आहे. अन्यथा न्यायालयात धाव घेण्यात येईल. राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला. 

पत्रकारांशी बोलताना साने म्हणाले, स्मार्ट सिटीच्या पहिल्याच निविदेमध्ये रिंग करण्यात येऊन ते काम एल अँण्ड टी  कंपनीला देण्याचा प्रयत्न होत आहे. याच कंपनीला काम देण्याबाबत मुख्यमंत्री कार्यालयातून दबाब येत आहे. या निविदेमध्ये प्री- बिड मिटींगला अनेक कंपन्या येवूनही त्या सहभागी का होऊ शकल्या नाहीत? त्यांच्या लेखी मागण्यांचा विचार का झाल नाही? निविदेला चारवेळा मुदतवाढ का देण्यात आली ? या कंपनीची निविदा सुमारे 8.34  टक्के वाढीव असूनही त्या कंपनीलाच काम देण्याचा अट्टाहास का ? यामध्ये सुमारे 21 कोटी ज्यादा दराने निविदा प्राप्त झाली आहे. असे विविध प्रश्न त्यांनी उपस्थित केले आहेत.

सत्ताधारी भाजपच्या एका ज्येष्ठ नगरसेवकानेही स्मार्ट सिटीच्या पहिल्याच निविदेत ‘रिंग’ करुन ते एका विशिष्ट कंपनीलाच देण्याचा प्रयत्न चालू असल्याचे शंका उपस्थित करत विविध तांत्रिक मुद्दे उपस्थित केले आहेत. त्यावरुन या निविदेमध्ये रिंग झाल्याचे स्पष्ट होत आहे. त्यामुळे त्यांच्या आरोपामध्येच नक्कीच तथ्य आहे.

या सर्व बाबी पाहिल्या तर एका विशिष्ट कंपनीसाठी अटी व शर्ती पूर्वनियोजित करुन नियोजनबध्द महापालिकेचा पैसा लुटण्याचा मोठा उपक्रम ‘स्मार्ट सिटी’ योजनेतून या शहरात होणार आहे. ‘ना भय ना भ्रष्ट्राचार’, ‘पारदर्शक कारभार, साफ नियत सही विकास’ या भाजपच्या घोषणांना स्थानिक भाजपचे पदाधिकारी सोयीस्करपणे हरताळ फासत आहेत, असा आरोपही साने यांनी केला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.